पुणे – शहरात सुरू झालेल्या मेट्रो मार्गांवर स्थानक परिसरात पार्किंगसाठी जागाच नसल्याने प्रवाशांची कोंडी होत आहे. तर, “पीएमआरडीए’कडून सुरू असलेल्या शिवाजीनगर ते हिंजवडी (मेट्रो मार्ग 3) स्थानकांच्या परिसरातही पार्किंगसाठी जागाच निश्चित करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, महापालिकेनेच पुढाकार घेत या दोन्ही मार्गांसाठी पार्किंगच्या जागा दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेतला आहे.
मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेसाठी प्रवाशांच्या वाहन पार्किंगसाठी जागांची पाहणीही सुरू करण्यात आली आहे. ही माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. परिणामी, पार्किंगअभावी मेट्रो प्रवाशांची होणारी कोंडी काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. मेट्रोकडून पार्किंगच सुविधा नसल्याने प्रवाशांची होणारी अडचण दैनिक “प्रभात’ने “कुठे कुठे शोधू तुला..’ या वृत्ताद्वारे उजेडात आणली होती.
ताब्यातील जागा देणार
मेट्रोला देण्यात येणाऱ्या जागा स्थानकांच्या परिसरातच शोधण्यासाठी महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी सुरू केली आहे. त्यानुसार माहिती मिळताच प्राप्त होताच तातडीने जागा दिली जाणार आहे. तर, या जागा अपुऱ्या पडण्याची शक्यता असल्याने आणखी जागा देण्यासाठी स्थानकांच्या परिसरातील रिकाम्या जागा, ऍमेनिटी स्पेस इतर आरक्षित जागांची माहिती दुसऱ्या टप्प्यात संकलित केली जाणार आहे. मात्र, त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे.