स्वित्झर्लंडपेक्षाही काश्मीर सुंदर
नवी दिल्ली, दि. 1 – भारताच्या पर्यटनविषयक माहितीत काश्मीरचे वर्णन “आशियातील स्वित्झर्लंड’ असे केले जाते; त्यास पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी आक्षेप घेतला आहे. येथे पर्यटन मंत्र्यांच्या परिषदेचे उद्घाटन करताना देसाई म्हणाले, काश्मीर हे स्वित्झर्लंडपेक्षा खूपच सुंदर आहे. म्हणून “युरोपातील स्वित्झर्लंडपेक्षा अधिक सुंदर’ असे काश्मीरचे वर्णन केले जावे.
चीनचे आंतरखंडीय क्षेपणास्त्रे
लंडन – चार हजार ते पाच हजार किमी अंतरावर हल्ला करू शकतील अशा क्षेपणास्त्रांची चीनने चाचणी घेतली आहे.
नाट्याचा जीवनाशी संबंध असला तरच ते जिवंत
मुंबई – नाट्याचा जर जीवनाशी संबंध नसेल तर ते नाट्य जिवंत राहू शकणार नाही. रंगभूमीवर येणारा कलावंत जर भूमिकेशी समरूप होऊ शकला नाही, तर त्याची भूमिका प्रेक्षकांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचणार नाही व ते नाट्य त्यांना खिळवूनही ठेवणार नाही, असे विचार सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
मराठी पत्रकारांनी सांस्कृतिक व नाट्यविषयक बातम्यांना अधिक स्थान देऊन उद्याच्या समृद्ध भारताची मुहूर्तमेढ रोवली आहे. कारण भारताला कसे घडवावे हे सांस्कृतिक कार्यामुळेच स्पष्ट होणार आहे.