पुणे – महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये ठेकेदारांमार्फत नेमण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुढील दोन दिवसांत दिवाळी बोनस द्यावा, असे आदेश महापालिकेचे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी काढले आहेत.
महापालिका कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दिवाळी बक्षीस तसेच बोनस मिळावा, या उद्देशाने कंत्राटी कामगारांकडून पालिकेसमोर गेली दोन आठवडे निदर्शने करण्यात आली होती. मात्र, सुधारित किमान वेतन कायद्यात ही तरतूद नसल्याने बोनस देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर कामगार उपायुक्तांकडून महापालिकेस पत्र देत कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत ठेकेदारांना सूचना द्यावात, असे आदेश देण्यात आले.
यानंतर महापालिकेने ठेकेदारांची बैठक घेत त्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या सर्व विभाग, क्षेत्रीय कार्यालये, परिमंडळ कार्यालयांनी कंत्राटी मनुष्यबळ पुरविलेल्या ठेकेदारांना दिवाळी बोनस दोन दिवसांच्या आत देण्याचे परिपत्रक काढले आहे. याचा लाभ सुमारे साडेनऊ हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.