पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पाटील इस्टेट झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या झोपडीधारकांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन केले जाणार असून त्यांना आहे त्याच ठिकाणी 300 चौरसफूटांची घरे देण्यात येणार आहेत. तसेच हे काम पुढील चार वर्षात पुर्ण केले जाणार असून त्यासाठी झोपडयांचे सर्वेक्षण येत्या सोमवार ( दि.25 ऑक्टोबर) पासून केले जाणार असल्याची माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे ( एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.
पाटील इस्टेट झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात संपूर्ण माहिती मिळावी यासाठी तेथील झोपडीधारक यांचे मागणीनुसार सदर झोपडपट्टीमधील सुमारे 500 झोपडीधारकांची एसआरएच्या वतीने बैठक घेण्यात आली. यावेळी निंबाळकर यांनी ही माहीती दिली.
हा प्रकल्प एसआरए आणि अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (COEP) यांचे वतीने संयुक्तपणे इच्छुक व सक्षम विकासकांकडून जाहीर खुल्या निविदा पध्दतीने राबविण्यात येणार आहेत.
त्यानंतर या प्रकल्पाचे सर्व आराखडे पुढील 3 महिन्यांमध्ये पूर्ण करून माहे जानेवारी 2022 मध्ये सदर निविदा प्रसिद्ध करून विकासकास माहे एप्रिल 2022 मध्ये कामाचे कार्यादेश देऊन साधारण पुढील 4 वर्षांमध्ये संपुर्ण प्रकल्पाचे काम पुर्ण करून सर्व पात्र निवासी व बिगर-निवासी झोपडीधारकांना त्यांचे प्रत्येकी हक्काचे घर तसेच व्यावसायिक जागा त्यांचे आत्ताचे आहे त्या ठिकाणीच मोफत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत उपस्थितांना एसाआरएच्या वतीने सादरीकरणाद्वारे पुनर्वसन प्रक्रिया, झोपडीधारकांची पात्रता व त्यासंबंधीचे आवश्यक पुरावे, झोपडीधारकांना मिळणाऱ्या सोई-सुविधा, प्रकल्प पुर्ण होण्याचा कालावधी इत्यादी बाबतची संपुर्ण माहिती दिली तसेच उपस्थित झोपडीधारकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. दरम्यान, सोमवार पासुन सर्वेक्षण कामास सुरूवात होणार असल्याने सर्व संबंधितांनी व विशेषतः झोपडीधारकांनी सहकार्य करावे असे आवाहन एसआरएच्या वतीने करण्यात आले आहे.