पुणे : कोथरूड, पौड रस्ता येथे असलेले दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरीत करण्यास विरोध करण्यात आला आहे. त्या भागातील वकील आणि नागरिकांनी हा विरोध केला आहे. मूळातच कोथरूड भागात एकच दुय्यम निबंधक कार्यालय आहे. ते हिंगणे येथे हलविण्याचा घाट घालण्यात येत आहे. त्यामुळे कोथरूडकरांवर अन्याय होत आहे. हे कार्यालय हलवू नये, यासाठी सह जिल्हा निबंधक, स्थानिक आमदार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थानिक नगरसेवकांना निवेदन देण्यात आले आहे.
पौड रस्त्यावरील ईशानी इमारतीमध्ये हे कार्यालय आहे. हे हिंगणे, कर्वेनगर येथे हटविण्यात येणार आहे. याविषयी ॲड. स्वप्निल अवधूत आणि ॲड. प्रदीप दिघे म्हणाले, पौड रस्त्याबरोबरच कोथरूड, बावधन आणि राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्यांना हे कार्यालय फायदेशीर आहे. मागील 18 वर्षांपासून येथे हे कार्यालय आहे. कोथरूड, बावधनकरांसाठी हे एकमेव कार्यालय आहे.
एरंडवणा येथे दोन, वारजे आणि म्हात्रे पूलभागात एक कार्यालय आहे. या परिस्थितीत हे कार्यालय जावू नये, यासाठी कोथरूडकर प्रयत्नशील आहेत. ज्या सोसायटीत कार्यालय होणार आहे. तेथील लोकांचाही यास विरोध आहे. कार्यालय हलवायचे असेल तर हलविण्यास हरकत नाही. परंतु ते कोथरूड, बावधन परिसरात हलविले पाहिजे. जेणेकरून त्या भागातील लोकांना त्याचा फायदा होईल. या मागणीला स्थानिक नेत्यांनी पाठींबा दिला आहे. स्थानिक नेत्यांनी लेटर हेडवर मागणीचे पत्र सह जिल्हा निबंधकांना दिले आहे.