पुणे – पुणे स्टेशनजवळ प्रवाशाला लुटमार करून पैशाची मागणी केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध अटकेची कारवाई केली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राजेश उर्फ चौपाट्या मंगल मंडल याची विशेष मोक्का न्यायलयाने ५० हजाराच्या जामिनावर मुक्तता केली. त्याने ॲड. अजित पवार व ॲड. प्रणित नामदे यांचे मार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. (Pune: One granted bail in Mcoca case)
सन २०२१ मध्ये फिर्यादी हे पुणे स्टेशन येथून वाघोली येथे जाण्याकरिता पहाटेच्या वेळी रिक्षाची वाट पाहत होते. त्यावेळी काही इसमांनी त्यांना जबरदस्ती रिक्षामध्ये बसवून चाकूने वार करून लुटमार केली होती व त्यांनी मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेचा तपास करत असताना बंडगार्डन पोलिसांनी राजेश उर्फ चौपाट्या मंगल मंडल व त्याच्या इतर साथीदार विरुध्द मोकांतर्गत कारवाही केली होती.
यामध्ये राजेश याने ॲड. अजित पवार व ॲड. प्रणित नामदे यांचे मार्फत मोक्का विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष मोक्का न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी तपासादरम्यान संशयित इसमांची ओळख परेड घेतली होती. सदर ओळखपरेड चुकीच्या पद्धतीने घेतली आहे व पोलीस तपासात गोळा केलेला पुरावा जामीन नाकारण्यासाठी पुरेसा नसल्याचे निरीक्षण नोंदवित हा आदेश दिला.