पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून विकास आराखडयानुसार, काम सुरू झालेल्या मात्र, अवघ्या 100 ते 200 मीटरचे भूसंपादन न झाल्याने रखडलेल्या रस्त्यांची यादी ( मिसिंग लिंक ) तयार केली आहे. हे भूसंपादन झाल्यास संबधित भागात नागरिकांना वाहतूकीसाठी पर्यायी रस्ते उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे, या पुढे आता या रस्त्यांसाठी भूसंपादन करावे लागणाऱ्या जागा मालकांची बैठक प्रत्यक्ष जागेवरच घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
त्या माध्यमातून जागेची आवश्यकता तसेच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्त्याची असलेली आवश्यकता याची माहिती जागामालकांना देऊन जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. महापालिकेने शहरात अशा निश्चित केलेल्या 33 मिसिंग लिंकचे रस्ते निश्चित केले आहेत. त्यांचा आढावा गुरूवारी ढाकने यांनी घेतला. यावेळी 33 मधील सात जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या असून त्यातील 4 ठिकाणी उर्वरीत रस्ता पूर्ण करण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे ढाकणे यांनी स्पष्ट केले.
25 टक्के वाहतूक कोंडी सुटणार –
महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हे 33 मिसिंग लिंकच्या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यास शहराच्या उपनगरांमधील वाहतूक कोंडी 25 टक्के सुटण्यास मदत होणार आहे. उपनगरातून शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यांना जोडणारे हे पर्यायी रस्ते आहेत. त्यामुळे, नागरिकांना मुख्य रस्त्यावर न येता वाहतूकीसाठीचा पर्याय उपलब्ध होणार आहे तसेच अवघ्या 100 ते 200 मीटरसाठी एक ते दोन किलोमीटर पर्यंत वळसा घेऊन करावा लागणारा प्रवास कमी होणार आहे. प्रामुख्याने हडपसर, कोंढवा आणि कोथरूड, विमाननगर, पाषाण, सिंहगड रस्ता, कात्रज, नगर रस्ता या भागातील हे रस्ते असल्याचे महापालिकेच्या वाहतूक सल्लागारांकडून सांगण्यात आले.
आदर्श रस्त्याच्या कामाला वेग-
दरम्यान, या बैठकीत महापालिकेकडून शहरात 15 आदर्श रस्ते विकसित केले जाणार असून या रस्त्यांच्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार, कोणत्या रस्त्यावर काय काम करायचे याची याची यादी तसेच वेळापत्रक पथ विभागाच्या अभियंत्यांना देण्यात आले आहे. दिवाळीत सुट्टयांमुळे रस्त्यांच्या कामांसाठी कर्मचारी नसल्याने या रस्त्यांची कामे रखडलेली होती. त्याला वेग देण्याच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या आहेत.