पुणे- टपाल विभागाने डिजिटलचे मार्ग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. यातच आता डिजिटल पेमेंटची भर पडली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिसमध्येदेखील डिजिटल पेमेंट करता येणार असून, पुणे ग्रामीण विभागात 94 पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा कार्यान्वित करण्यात आली.
सध्या विविध शासकीय यंत्रणांनी ऑनलाइनचा स्वीकार केला असून, बहुतांश शासकीय कामे, शुल्क भरणे आता एका क्लिकवर होते. मात्र टपाल विभागात रोख रकमेची अट कायम होती. मात्र आता पोस्टानेदेखील डिजिटल पेमेंटचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे आता नागरिकांना रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता भासणार नसून, कर्मचारी आणि ग्राहकांमधील सुट्या पैशांवरून होणारा वाद मिटणार आहे.
पहिल्या टप्प्यात पुणे ग्रामीण विभागात केवळ बारामती प्रधान डाक घर येथे डिजिटल पेमेंटची सेवा सुरू केली होती. नुकतीच विभागातील 94 पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मनीऑर्डर, पार्सल बुकिंग, स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट आदीचे शुल्क आता “क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतर देता येणार असल्याचे विभागाचे डाकघर अधीक्षक बी. पी. एरंडे यांनी सांगितले.