फलटण : राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत फलटणमधील विकासकामांसाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व आ. दीपक चव्हाण यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी दिल्याचे संजीवराजे म्हणाले.
मंगळवार पेठेतील सध्याची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिराची इमारत पाडून तेथे नवीन समाजमंदिर उभारणे (अडीच कोटी), रविवार पेठेतील सुपर मार्केट पाडून त्या जागी नवीन मार्केट उभारणे (पाच कोटी), दत्तनगर-शिंदे बिल्डिंग-दगडी पूल-हनुमान मंदिर-वेलणकर दत्त मंदिर नाला बंदिस्त करणे (अडीच कोटी), सेफ सिटी योजनेंतर्गत शहरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे (अडीच कोटी), प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनात अत्याधुनिक ध्वनियंत्रणा बसवणे (अडीच कोटी) निधी मंजूर करण्यात आला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर व सुपर मार्केट या दोन जुन्या, जीर्ण इमारती सद्य स्थितीत वापरायोग्य नाहीत. वाढत्या लोकवस्तीच्या अपेक्षा, गरजा पूर्ण करण्यासाठी या इमारती नव्याने बांधून, त्यामध्ये अत्याधुनिक साधने, सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. दत्तनगर-दगडी पूल-हनुमान मंदिर-वेलणकर दत्त मंदिर या मार्गावरील नाला बंदिस्त केल्यास, त्यामधून वाहून जाणारे सांडपाणी आणि पावसाळ्यातील पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येईल.
या पाण्याचा शेतीसाठी किंवा बागेसाठी फेरवापर करता येणार आहे. त्याचबरोबर या नाल्याच्या पाण्यामुळे निर्माण होणारी आरोग्य समस्या दूर करणे शक्य होणार असल्याचे संजीवराजे यांनी सांगितले. सीसीटीव्ही यंत्रणा आज प्रत्येक शहराची अत्यावश्यक गरज आहे. प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनाची फेरउभारणी होत असताना, तेथील ध्वनियंत्रणेत सुधारणा करणे आवश्यक आहे.
ना. रामराजे यांच्या दूरदृष्टीमुळे फलटण शहर व तालुक्यात शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी या नागरी सुविधा गेल्या 30-35 वर्षांत निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यांची दूरदृष्टी, शरद पवार व ना. अजित पवार यांची भक्कम साथ असल्याने फलटण तालुक्यातील कायम दुष्काळी पट्टा आज कृष्णेच्या पाण्यावर सुजलाम् सुफलाम् होत आहे. शेती उत्पादनात भरीव वाढ आणि योग्य बाजारपेठ लाभल्याने बळीराजा समाधानी असल्याचे फलटण बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.