केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे मत
पुणे – अलीकडे दिल्लीत सनदी अधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी असलेल्या सुविधेचा गैरवापर केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाने कठोर कारवाई केली आहे. खेळांविषयीच्या सुविधा या केवळ खेळाडूंसाठी आहेत, हाच स्पष्ट संदेश यातून केंद्र सरकारला द्यायचा आहे. खेळाविषयाची सुविधांचा वापर सर्वांसाठी खुला असायला हवा. मात्र, या सुविधांचा कोणी आणि कसा करावा याबद्दलचे स्पष्ट नियम असा हवेत. खेळांशी संबंधित कोणत्याही गोष्टींमध्ये राजकीय हस्तक्षेप असता कामा नये, असे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज येथे सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचे उद्घाटन, कुस्तीपटू खाशाबा जाधव आणि स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार गिरीश बापट, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य सुनेत्रा पवार, क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष राजेश पांडे आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. दीपक माने उपस्थित होते. ठाकूर म्हणाले, भारतीय खेळाडूंना अधिकाधिक पदके जिंकण्याच्या दृष्टीने सक्षम बनवायचे आहे. मात्र, त्यासाठी केंद्र-राज्य सरकार, राष्ट्रीय खेळ प्राधिकरण, राज्य क्रीडा संघटना आणि क्रीडाविषयक कॉर्पोरेट
संस्था या सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. पुणे विद्यापीठाने क्रीडा संकुलाच्या माध्यमातून क्रीडा विषयक पायाभूत सोयीसुविधा उभारण्याचे मोठे काम केले आहे. जेव्हा अशा पायाभूत सोयी सुविधा उभ्या राहतात, तर त्याच्या वापराचा खेळाडूंना लाभ होतो.आपल्याकडची राज्य आणि विद्यापीठं यांच्यामध्ये खेळांबाबतची निकोप स्पर्धा असायला हवी, तरच आपल्याकडची विद्यापीठे देशासाठी अधिकाधिक पदके जिंकून देऊ शकतील.
विद्यापीठाला सहकार्य
कबड्डीप्रमाणेच खो-खो, मल्लखांब, तांगटा, योगाभ्यास यांसारख्या भारतातल्या इतर पारंपरिक खेळांनाही आंतरराष्ट्रीय खेळांचे स्थान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र सरकारला खेलो इंडिया अंतर्गत इथल्या विद्यापीठांची स्पर्धा आयोजित करायची असेल, त्यास केंद्र सरकार सहकार्य करेल, अशी ग्वाही ठाकूर यांनी दिली.
“खेलो इंडिया’ची हजार केंद्र
क्रीडा मंत्रालयाच्या वतीने देशभरात “खेलो इंडिया’ची योजना सुरू करण्यात आली. त्यासाठी देशात हजार केंद्र तयार करायचा प्रयत्न असेल. या केंद्रामध्ये प्रशिक्षक म्हणून येणाऱ्या माजी खेळाडूंना 5 लाख रुपयांचे सहकार्य दिले जाईल. आजवर 450 केंद्रांना मान्यता मिळाली आहे. उर्वरित केंद्रांना ऑगस्ट 2023 पर्यंत मान्यता मिळेल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.