पुणे – पुणे विद्यार्थी गृहाचे सहकारनगर येथील इंग्रजी माध्यमाच्या मुक्तांगण प्राथमिक शाळेतील (school) मुला-मुलींवर अत्याचार (sexual abuse) झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यासदंर्भात शेकडो पालकांनी सोमवारी शाळेच्या आवारात एकत्रित येत शाळा प्रशासनास जाब विचारला.
दरम्यान, घडलेल्या प्रकाराची गंभीरता लक्षात घेता पालकांनी थेट पर्वती पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आहे. याप्रकरणी अत्याचार करणारे विद्यार्थी व त्यास जबाबदार असणाऱ्या शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली.
सहकारनगर परिसरातील नामांकित मुक्तांगण प्राथमिक शाळेतील ह्या प्रकाराने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मोठ्या वर्गातील काही विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत मुला-मुलींवर अत्याचार होत असल्याची माहिती मुलांकडून पालकांना मिळत होती.
सुरुवातीला काहीचा शुल्लक प्रकार असावा, असे समजून पालकांनी दुर्लक्ष केले. हा प्रकाराची अन्य पालकांकडून तक्रार आल्याने ही बाब शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतरही शाळा प्रशासनाकडून काहीच पाऊल उचलले गेले नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
लहान मुलांच्या शौचालयामध्ये मोठ्या वर्गातील मुलांकडून लैगिंक शोषणाच्या तक्रारी आहेत. त्याचबरोबर लहान मुलांच्या हातावर पेनाने आरखडणे, शौचालयात अश्लिल कृत्य करण्यास भाग पाडणे, अशा गंभीर स्वरुपाच्या तक्रारी आहेत.
शाळा प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने पर्वती पोलीस स्टेशन येथे संबंधित विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे पालकांकडून सांगण्यात आले आहे.
अत्याचाराचा प्रकार घडला असेल तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. संस्थेने हे प्रकरण पोलिसांकडे दिले आहे. पोलीस योग्य ते तपास करीत आहेत. दोषींवर कारवाई केली जाईल.
– प्रा. राजेंद्र कांबळे (कार्यवाह : पुणे विद्यार्थी गृह)