विश्रांतवाडी (प्रतिनिधी) : धानोरी येथील आनंदपार्कमधील इमॅन्युअल मार थोमा स्कुलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेले वैविध्यपूर्ण प्रकल्प पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी गर्दी केली होती. या उपक्रमात सहभागी झालेले सर्वच विद्यार्थी प्रकल्प पाहण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला त्याचे महत्व पटवून देत सविस्तर माहिती सांगत होते.
विज्ञानाचे महत्व अधोरेखित करण्याबरोबरच विद्यार्थ्यांची जिज्ञासूवृत्ती व प्रयोगशीलता वाढीस लागावी या उद्देशाने आयोजित विज्ञान प्रदर्शनात विद्यालयातील सुमारे ४७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व जीवशास्त्रावर आधारित विविध प्रकारचे ४१० प्रकल्प तयार केले होते.
ट्रॅफिक, इको-फ्रेंडली, पॉवर, रोबोटिक्स, प्रदूषण, जिवंत शरीरातील यंत्रणा, सौरऊर्जा, पवनचक्की, मोटर बोट, फायर डिटेक्टर वाटर सिवेज ट्रीटमेंट, सोलर एनर्जी, पाण्याच्या दाबाने चालणारे क्रेन यासारखे विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प घरातील टाकाऊ वस्तूंपासून बनविण्यात आले होते.
प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना शिल्पा परदेशी, रिहाना हुजरे, समीना शेख, समरीन जमादार, कैफिया अन्सारी यांनी मार्गदर्शन केले. तर मुख्याध्यापिका संध्या सुरेश यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.