पुणे -यंदा दिवाळीत लक्ष्मीपूजनाला स्वारगेट परिसरात 99.7 डेसिबल (डीबीए) ध्वनी प्रदूषणाची नोंद झाली आहे. या पाठोपाठ खडकी आणि शिवाजीनगर परिसरात सर्वाधिक नोंद झाली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) 12 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या ध्वनी पातळी निरीक्षण आकडेवारी दिली आहे. त्यानुसार या वर्षी ज्या भागात आवाज पातळीचे परीक्षण केले गेले होते, त्या सर्व क्षेत्रांमध्ये मानक मर्यादेपेक्षा जास्त आवाजाची पातळी नोंदवली गेली आणि सायंकाळी सहा ते नऊ या दरम्यान आवाज पातळी जास्त होती.
एमपीसीबीने दोन दशकांहून अधिक काळ दिवाळी सणादरम्यान आवाजाचे निरीक्षण केले आहे. या वर्षी देखील ते करण्यात आले आहे. मंडळाने शहरातील 11 वेगवेगळ्या ठिकाणी ध्वनी पातळी निरीक्षण केले.
एमपीसीबीच्या निरीक्षणानुसार, शिवाजीनगर, कर्वे रोड, सातारा रोड, स्वारगेट, खडकी, येरवडा, शनिवारवाडा, लक्ष्मी रोड, सारस बाग, औंध गाव आणि विद्यापीठ रस्त्यासह सर्व 11 ठिकाणी 90 डेसिबलच्या वर मर्यादित आवाजाची नोंद झाली आहे, असे प्रशासनाने सांगितले.
परिसर आणि आवाजाचे प्रमाण (डेसिबल)
स्वारगेट 99.7
खडकी 99.6
शिवाजीनगर 99.4
कर्वे रस्ता 99.4
सातारा रस्ता 99.4
शनिवारवाडा 99.4
लक्ष्मी रस्ता 98.7
सारसबाग 98.3
येरवडा 96.2
औंध रस्ता 94.4
विद्यापीठ रस्ता 92.2