सिंहगडरस्ता –वडगाव खुर्द मधुकोष येथे पाणी योजनेअंतर्गत 40 लाख लिटर पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. या टाकीसाठी पाइपलाइन टाकण्याचे कामही पूर्ण झालेले आहे. परंतु, कालव्यावरून पाइपलाइन आणण्याचे काम रेंगाळल्याने या टाकीत पाणी सोडून अद्याप ट्रायल घेण्याचे काम झालेले नसल्याने काम पूर्ण होऊनही या टाकीचा वापर होत नसल्याने नागरिकांनी या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या टाकीमुळे मोठमोठे गृहप्रकल्प राजयोग, क्रॉस ओवर काउंटी, सिरीन काउंटी मियामी, मधुकोष, सुंदर संस्कृती, प्रयेजा सिटी आणि या भागातील बरेच गृहप्रकल्पांचा पाणीप्रश्न कायमचा सुटण्यास मदत होईल, असे या भागातील नागरिकांनी सांगितले. संबंधित विभागाने या पाण्याच्या प्रश्नात लक्ष घालून लवकरात लवकर टाकीत पाणी सोडावे व त्याची ट्रायल घ्यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
येथील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले आहे. ही टाकी लवकरात लवकर कार्यान्वित करावी आणि त्याचा फायदा नागरिकांना मिळावा, अशी आमची मागणी असून यासंदर्भात अधीक्षक अभियंता पाणीपुरवठा पुणे महानगरपालिका यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.
– सारंग नवले, संघटक, भारतीय जनता युवा मोर्चा
टाकीचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, कालवा मध्येच आल्याने त्यावरून पूल टाकून पाण्याची लाइन घ्यायची आहे, यासाठी अजून साधारणपणे दोन ते तीन महिने टाकीत पाणी सोडता येणार नाही, पाइपलाइनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
– अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महानगरपालिका