पुणे – नगरसेवकांना प्रभागात वाटण्यासाठी तब्बल 16 कोटी रुपयांच्या बकेट आणि बाकडे खरेदीसाठी मनपा स्थायी समितीने एकमुखी दिली. तर, माजी स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रभागातील दवाखान्यात सी. टी. स्कॅन यंत्रासाठी 33 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यास नकार दिल्याचा प्रकार मंगळवारी स्थायी समिती बैठकीत घडला. यावेळी माजी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांना बैठकीतच रडू कोसळले.
कदम म्हणाल्या, “आपण स्थायी समिती अध्यक्ष असताना शिवशंकर पोटे दवाखान्यात एमआरआय यंत्र बसविण्याचा प्रस्ताव मान्य झाला. 2017 मध्ये साडेनऊ कोटींची मशिन बसविण्यात आली. तेथे सी. टी. स्कॅन यंत्रही प्रस्तावित होते. त्यासाठी 2 कोटी 34 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, गेल्या पाच वर्षांत तुटपुंजा निधी मिळाला. त्यामुळे हा प्रकल्प अपूर्ण आहे.’ त्यामुळे कदम यांनी आपल्या वॉर्डस्तरीय निधीतील तब्बल 1 कोटी 97 लाखांचा निधी वर्गीकरणाद्वारे सी. टी. स्कॅन यंत्रासाठी दिला. मात्र, त्यानंतरही 33 लाखांचा निधी कमी पडत असल्याने आधी पक्षाचे पदाधिकारी, शहराध्यक्ष तसेच स्थायी समितीच्याही निदर्शनास आणून दिला. मात्र, तरीही निधी मिळत नसल्याने आपण आयुक्तांकडे विनंती केली. प्रकल्प शहराच्या हिताचा असल्याने आयुक्तांनीही तातडीने निधी देण्याचे आश्वासन देत वैद्यकीय महाविद्यालयासाठी असलेल्या निधीतून हे 33 लाख रुपये देण्यास तयारी दर्शविली. त्यानुसार आरोग्य विभागाने स्थायी समितीत प्रस्तावही आणला. मात्र, या विषयाची माहिती हवी असे सांगत तसेच आयत्यावेळी तो मंजूर करू नये, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केल्याने तो पुढे ढकलण्यात आला आहे.’
प्रस्ताव आयत्यावेळी आला
हा निधी देण्याचा प्रस्ताव आयत्यावेळी आल्याने हा प्रकार घडला आहे. समितीच्या बैठकीत शेवटचा विषय झाल्यानंतर प्रशासनाने हा प्रस्ताव आणला. त्यामुळे त्यांना गडबड न करता त्याची आधी माहिती द्यावी, तसेच तो पुढील आठवड्याच्या कार्यपत्रिकेवर घ्यावा अशी मागणी काही सदस्यांनी केली. त्यामुळे हा प्रस्ताव पुढच्या आठवडयात घेतला जाणार असून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या सदस्यांना खडेबोल
निधी मंजूर होत नसल्याने अश्विनी कदम यांनी स्थायी समिती सदस्यांना खडे बोल सुनावले. यावेळी राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही या प्रस्तावाबाबत काहीच भूमिका न घेतल्याने कदम यांनी समितीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनाही सुनावले. त्यामुळे हे सदस्य आणि कदम यांच्यात खडाजंगी झाली. दरम्यान, या प्रकाराबाबत पत्रकार परिषदेत माहिती देतानाही कदम यांच्या अश्रूंचा बांध फुटला.