पुणे –महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा महाविकास आघाडीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचा सूर बदलला आहे. या प्रभाग रचनेमुळे पक्षाचे 122 नगरसेवक निवडून येतील, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वबळावर लढावे, अशी आपली प्रामाणिक भूमिका असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे. जगताप यांच्या वक्तव्यामुळे आघाडीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, त्याच वेळी पक्षाचे वरिष्ठ नेते आघाडीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, जगताप यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत “राजकीय फटाके’ फुटण्यास सुरुवात झाली असून, शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे.
शहराध्यक्ष जगताप म्हणाले की, जाहीर झालेली प्रभाग रचना पारदर्शक आहे. ही प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पक्षाला किमान 122 जागा मिळतील. कार्यकर्तेही त्याबाबत आग्रही आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवसांत शहरातील सर्व ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून शुक्रवारी पक्षांच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक बोलविली आहे. स्वबळावर निवडणूक लढण्याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. मात्र, अंतिम निर्णय हे वरिष्ठ घेतील. आघाडीबाबत शिवसेना, कॉंग्रेसबाबत चर्चा झाली असली तरी प्राथमिक पातळीवर ही चर्चा झाली आहे. आघाडीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. प्रत्येक पक्ष स्वत:ची स्वबळावरच तयारी करीत आहे. त्यामुळे आघाडीचा अधिकृत निर्णय होणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादीची तयारी स्वबळाच्या अनुषंगानेच राहणार असून, आघाडीचा निर्णय झाल्यास आघाडीचाही पक्षालाच फायदा होईल, असेही जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
16 जण पक्षात येण्यास तयार…
शहरातील प्रभाग रचना पाहता पक्षात इतर पक्षातील 16 जण येण्यास तयार आहेत. त्यामुळे पक्षाला त्यांच्यासाठीही जागांची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने त्यांचे पक्षप्रवेश होतील. 14 मार्चला या नगरसेवकांची मुदत संपणार असल्याने या नगरसेवकांना पक्षात येण्यासाठी राजीनामा द्यायची गरज लागणार नाही. पक्षाच्या उमेदरवारांबाबत तसेच निवडणुकीसाठी येत्या शनिवारी पक्षाचे नेते अजित पवार यांच्याशी बैठक होणार आहे. त्यानंतर उमेदवारांचा प्रवेश तसेच निवडणुकांचे उमेदवार लवकरच जाहीर केले जातील. त्यामुळे राष्ट्रवादी 100 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा जगताप यांनी केला आहे.