महोत्सव सुरू करणे सोपे असते परंतु, तो सातत्याने सुरू ठेवणे अवघड असते, असे म्हटले जाते. आबा बागुल यांनी श्री लक्ष्मीमातेच्या चरणी अर्पण केलेला हा “पुणे नवरात्रौ महोत्सव’ पहिल्या वर्षापासूनच अतिशय दिमाखदारपणे व उत्साहात आजपर्यंत सुरू आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. नवरात्रीच्या काळात सलग 10 दिवस आणि तब्बल 29 वर्षे सुरू असलेल्या महाराष्ट्रातील या प्रमुख सांस्कृतिक महोत्सवाचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतात ही देखील विशेष बाब मानली पाहिजे.
– अमित बागुल, पुणे
शिवदर्शन-सहकारनगर भागात आबा बागुल यांनी 1993च्या सुमारास दाक्षिणात्य धाटणीचे श्री लक्ष्मीमातेचे भव्य मंदिर उभारले. देवीच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी “पुणे नवरात्रौ महोत्सव’ त्यांनी सुरू केला. कै. भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या अभंगवाणीने महोत्सवाचा प्रारंभ झाला होता. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी येथे पसायदान गाऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शेकडो कलावंतांनी पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या मंचावर आपली कला सेवा रुजू केली आहे. किंबहुना, असे नामवंत कलावंत ऐकण्याची व बघण्याची संधी पुणेकरांना गेली 29 वर्षे मिळत आहे. ती पुणे नवरात्रौ महोत्सवामुळेच! याशिवाय समाजात सातत्याने महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या 5 व्यक्तींचा या उद्घाटन सोहळ्यात “श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविले जाते. तसेच, अतुलनीय योगदान देणाऱ्या एका व्यक्तीस “महर्षी’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. दरवर्षी उद्घाटन सोहळ्यात सिनेतारकांची उपस्थिती हे महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.
पुणे नवरात्रौ महोत्सवाला “महोत्सव एक-पैलू अनेक’असे म्हंटले जाते. याचे महत्वाचे कारण म्हणजे हा केवळ सांस्कृतिक महोत्सव न राहता या माध्यमातून दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, साहित्यिक, पर्यटन, संस्कार संवर्धन, व्यसनमुक्ती अशा विविध क्षेत्रात अनेक उपक्रम राबविले जात असतात. पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात दरवर्षी हजारो महिलांच्या सहभागातून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सौ. जयश्री आबा बागुल प्रयत्नशील असतात. विविध क्षेत्रात काम करून स्वकर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या युवती व महिलांचे कौतुक म्हणून “तेजस्विनी’पुरस्कार देऊन त्यांचा विशेष गौरवही केला जातो.
आज महोत्सवाचे उद्घाटन….
पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात सातत्याने मोलाची भर टाकणारा “पुणे नवरात्रौ महोत्सव’ हा यंदा 29वे दिमाखदार वर्ष साजरे करीत आहे. गेली 30 वर्षे पुणे महापालिकेत नगरसेवक असलेले माजी उपमहापौर आबा बागुल हे या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष असून यंदा घटस्थापनेच्या दिवशी रविवारी (दि.15) सायंकाळी 5:30 वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे दिमाखदार उद्घाटन सोहळा होणार आहे.