कोथरूड -स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका कधी जाहीर होतील, त्याकडे लक्ष न देता प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत पक्ष पोहचवा. प्रभागातील समस्या, नागरिकांच्या अडचणी यांना प्रथम प्राधान्य देऊन त्या सोडवा. या कामाची पोहचपावती नक्कीच आपल्याला मिळेल आणि महापालिका निवडणुकीत पुणे महापालिकेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकेल, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “वेध भविष्याचा-विचार राष्ट्रवादीचा’ शिबिर झाले. याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जगताप बोलत होते. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन दीपक मानकर यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुधीर भोंगळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची विचारधारा, पक्षाची संघटनात्मक रचना व बांधणी, विविध फ्रंटल व सेलचे संघटन रचना व बांधणी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, ही बांधणी पक्षाला कशाप्रकारे मजुबत करते, याची उदाहरणे दिली.
विकास लवांडे यांनी महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक जडण घडण, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व समाजसुधारकांची सर्वसमावेशक विचारधारा याबाबत मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातून परराज्यात गेलेले प्रकल्प आणि सर्वसामान्यांचे प्रश्न, नोटबंदी नंतर आर्थिक व्यवस्थेवर झालेले दुष्परिणाम याबाबत हेमंत देसाई यांनी मनोगत मांडले.