पुणे -जिल्हा परिषदेच्या हवेली-पुरंदर बांधकाम उपविभागामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी दक्षिण बांधकाम विभागातील उपअभियंता संजय गीते यांची चौकशी लावली आहे. “ऑन ड्युटी’ आखाड पार्टीचे आयोजन व त्यातील डान्स तसेच गैरप्रकाराच्या तक्रारी अभियंत्यांस चांगल्याच भोवणार असून चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधीतांना कामकाज अधिकार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
याबाबत डॉ. आयुष प्रसाद यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, दक्षिण बांधकाम विभागातील उपअभियंता संजय गीते यांच्यासह या विभागातील काही कर्मचारी विविध कामाच्या अनियमितेत अडकले असून त्यांच्या शंकास्पद कामाविषयी पुरंदर व हवेलीमधून तक्रारी आल्या आहेत. याबाबत माजी जि. प. सदस्य गंगाराम जगदाळे यांनी तक्रार करीत उपविभाग अभियंता, शाखा अभियंता तसेच अन्य कर्मचाऱ्यांची गैरव्यवहाराबाबत लिखीत तक्रारही केली आहे, त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, चौकशी समितीमध्ये उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप माने आणि जिल्हा कृषी अधिकारी अनिल देशमुख यांचा समावेश आहे. यातून हवेली व पुरंदरमधील बांधकाम उपविभागातील अनियमीत प्रकरणे समोर येत आहेत.
हवेली-पुरंदर बांधकाम उपविभाग कार्यालयात गैरप्रकार झाल्याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर याबाबत चौकशी करण्याची मागणी सातत्याने होत होती. सदरकामी कामी प्रत्यक्ष बाबी निदर्शनास आल्याने याकामी गांभीर्याने दखल घेत चौकशी समिती नेमण्यात आली आहे, याबाबतचा अहवाल आल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
– डॉ. आयुष प्रसाद,
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा मार्ग क्रमांक 132 रस्त्याचे काम मंजूर असताना प्रत्यक्षात हे काम रस्ते क्रमांक 39चे करून बिल काढण्यात आले. खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम निकृष्टचा अहवाल आल्यानंतरही कारवाई झाली नाही. नांदेड गावातील रस्ता महापालिकेत समावेश झाल्यानंतर केला गेला, आखाड पार्टी केली गेली, या तक्रारींबाबत चौकशी सुरू आहे.
– प्रदीप माने,
उत्तर विभाग कार्यकारी अभियंता (चौकशी समिती)