पुणे – पादचारी हा रस्त्याचा समजला जातो. मात्र, अतिक्रमणे तसेच दुरावस्थेमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागते. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, त्याचे महत्त्व समजावे, या उद्देशाने महापालिकेच्या माध्यमातून 11 डिसेंबर रोज पादचारी दिन साजरा करणार आहे. देशातील पहिले शहर असणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंग़ळवारी पत्रकार परिषदेत दिली.
त्यासाठी, महापालिकेच्या वतीने नुकतीच पादचारी, वाहतूक, तसेच सार्वजनिक वाहतूकीबाबत काम करणाऱ्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पोलीस अधिकारी आणि महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.
महापौर मोहोळ म्हणाले, भारतातील अनेक शहरांमध्ये सहसा पादचाऱ्यांची सोय आणि सुरक्षितता ह्याकडे दुर्लक्ष होत आले आहे. पुण्यामध्ये मात्र स्ट्रीट डिझाईन गाईडलाइन्स, पादचारी घोरण, नॉन मोटराईइड वाहतूक समिती अशा अनेक घटकांमुळे हे चित्र पालटण्यास काही अंशी सुरुवात झाली आहे. तरीही या सुधारणांना अजून व्यापक पाठिंबा मिळाल्यासच आपले शहर खऱ्या अर्थाने पादचारी- स्नेही होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकेल. पर्यावरण दिन, महिला दिन असे दिवस गेली कित्येक वर्षे सातत्याने साजरे झाल्यामुळे त्या त्या विषयाबाबत बरीच जागृती आणि सुधारणा होण्यास हातभार लागला आहे. पादचारी दिन साजरा केल्यानेही असाच फरक पडेल, ही ह्या दिनामागची संकल्पना असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
“पादचारी दिनाच्या निमित्ताने शहरातील पादचारी मार्गांची दुरुस्ती, पादचारी भुयारी मार्गांचे नूतनीकरण, सीसीटीव्ही कॅमेरा आणि लाईट्स अशा विविध विषयांवरही काम करण्यात येणार आहे. हा उपक्रम म्हणजे केवळ एकदिवसीय इन्व्हेंट न करता, यात भरीव काम करण्याचा आपला मानस आहे.”- मुरलीधर मोहोळ ( महापौर )