मुंबई – आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा पुढील महिन्यात होत असून त्यासाठी मैदानात उपस्थित राहून सामने पाहण्याची परवानगी अमिराती व ओमान सरकारने दिली आहे.
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी याबाबत केलेल्या विनंतीला यश आले असून सचिव जय शहा यांनी दोन्ही देशांच्या सरकारचे आभार मानले आहेत. करोनाच्या धोक्यामुळे यजमानपद भारताकडे असूनही ही स्पर्धा या दोन देशांत होत आहे.
या स्पर्धेच्या दरम्यान स्टेडियममधील आसन क्षमतेच्या 70 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार असून आयसीसी व बीसीसीआयच्या विनंतीला मान्य करण्यात आले आहे. या स्पर्धेला येत्या 17 ऑक्टोबर रोजी मस्कतमध्ये सुरुवात होणार आहे. स्पर्धेची अंतिम लढत 14 नोव्हेंबरला दुबईत होणार आहे.
अमिराती व ओमानने सुरक्षित वातावरणात चाहत्यांना या स्पर्धेतील सामने पाहता यावेत यासाठी खास सुरक्षा व्यवस्थाही तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. या स्पर्धेत 16 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. सामने पाहण्यासाठी उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना करोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दुबईत होणार आहे.