लाहोर – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाची अवस्था सध्या कामगिरीच्या निकषावर सुमार होत असून आता त्यांच्या मंडळालाही दिवाळखोरीचा सामना करावा लागत आहे. पाककडून खेळत असलेल्या खेळाडूंच्या राहणीमान तसेच चहापाणी यांच्यावरील खर्चातही कपात केली जात आहे. त्यातच खेळाडूंनी दिवसातून दोन वेळ नव्हे तर एकदाच चहा घ्यावा तसेच रूममधील एसी देखील बंद ठेवावा, अशा सूचना मंडळाने केल्या आहेत.
न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणाने पहिलाच सामना सुरू होण्यास अवघी काही मिनिटे बाकी असताना संपूर्ण मालिकेतूनच माघार घेतली. त्यांनी तातडीने पाकिस्तानातून मायदेशी प्रयाणही केले. मात्र, याच मालिकेपूर्वी मंडळाने पाक संघातील खेळाडूंना या काटकसरीच्या सूचना केल्याचे सोमर आले आहे.
न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंडनेही पाकचा दौरा रद्द केला, त्यामुळे आधीच आर्थिक स्थिती बिकट झालेल्या पाक मंडळाची सध्याची अवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष रमीझ राजा यांनीच ही काटकसर करण्यावर आग्रही भूमिका घेतली.
दोन ऐवजी एकच कप चहा घ्या, एसीचा वापर कमी करा तसेच शक्य असेल तर एसी बंदच ठेवा. कार्यालयातून बाहेर पडण्यापूर्वी दिवे बंद करा. या व अशा अनेक सूचना पाक मंडळ देत असून त्यांचे पालन खेळाडूंना बंधनकारक करण्यात आले आहे.
पदाधिकाऱ्यांच्या पगारातही कपात
पाक मंडळातील ज्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना जास्त पगार मिळतो त्यांच्याही पगारात कपात करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पाक संघ जर जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी नसताना या सर्व खर्चांना काही अर्थच उरत नाही. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान व माजी कर्णधार इम्रान खान यांच्याच सल्ल्यानुसार काटकसर करण्याचे ठरवले असल्याचे राजा यांनी सांगितले.