पुणे –शैक्षणिक शुल्कमाफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही अनेक महिने उलटले तरी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने अद्याप कार्यवाही न केल्यामुळे संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांच्या “मार्ड’ संघटनेने अखेर शुक्रवारपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला. ससून रुग्णालयासह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टर यामध्ये सहभागी झाले आहेत.
राज्यातील निवासी डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची शैक्षणिक शुल्कमाफी, राज्यातील सरकारी मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाचा मुद्दा यांसारख्या विविध समस्यांबाबत सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे संपाचा निर्णय घेण्यात आला आहे.
बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची “मार्ड’ या संघटनेने याबाबत माहिती दिली. या संपात ससून रुग्णालयातील 500 निवासी डॉक्टरांसह राज्यभरातील पाच हजारांहून अधिक डॉक्टर्स सहभागी झाले आहेत.
निवासी डॉक्टर दोन वर्षे करोना सेवेत असल्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवलेला नाही. तेव्हा शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी “मार्ड’तर्फे गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे. मंत्री अमित देशमुख यांनीही याबाबत आश्वासन दिले होते. परंतु, त्यानंतरही यावर ठोस कार्यवाही विभागाने झाली नाही. त्यामुळे अखेर “मार्ड’ डॉक्टर्स संपावर गेले आहेत, तर आपत्कालीन आणि अतिदक्षता विभागातील सेवा सुरू असतील, असे “मार्ड’ने स्पष्ट केले आहे.
निवासी डॉक्टर संपावर गेल्याने पडत असलेला रुग्णसेवेवरील ताण पाहता संप मागे घ्यावा, अशी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून विनंती केली आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत “मार्ड’ डॉक्टर संपावर ठाम आहेत.
संपामुळे सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचाराच्या बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी), सर्व नियोजित शस्त्रक्रिया, नियोजित प्रक्रियासंबंधी कार्य बंद ठेवले होते. सर्व लसीकरण कार्यक्रम सेवाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मेडिकल कॉलेजमधील जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती आहे, तिथे सर्व आवश्यक तत्काळ सेवा, आपत्ती निवारणाच्या आवश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
– डॉ. ज्ञानेश्वर जामकर, सचिव, “मार्ड’ संघटना, पुणे शाखा