- किवळे पूल वळणावर घटना : 28 जण जखमी
देहूरोड – साखरपुड्यासाठी सांगलीला निघालेल्या 40 प्रवासीसंख्या असलेल्या बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटून भीषण अपघात झाला. पुणे-मुंबई द्रुतगतीवरील किवळे पुलाच्या वळणावर रविवारी (दि. 27) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. यामध्ये एका आठ वर्षीय मुलासह 28 प्रवासी जखमी झाले असून त्यातील दोघे प्रकृती गंभीर आहे. जखमींवर अतिदक्षता विभागात तर 4 जखमींना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तसेच 22 किरकोळ जखमींवर उपचारा करून त्यांना घरी सोडण्यात आले.
ओम भरत साखरेकर (वय 8), सागर तुकाराम सोनवले (वय 25), बुद्धाजी शंकर रसाळ (वय 55), मनोहर शंकर रसाळ (वय 49), रवींद्र बुद्धाजी रसाळ (वय 23), रघुनाथ भिकाजी राऊत (वय 61) अशी जखमीचे नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाहतूक नियंत्रक विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश पवार आणि देहूरोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शाहिद पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पानसरे टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सची आराम बस (एम. एच. 04 /एफ.के/3786) साखरेकर यांचे कुटुंबीयांचा साखरपुडा कार्यक्रमासाठी शहापूर, कल्याण ते पलूस, सांगली या ठिकाणी 40 प्रवासीसह रविवारी सकाळी निघाली होती. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-मुंबई द्रुतगतीवरील किवळे येथील उड्डाणपुलाच्या वळणावर सकाळी साडेअकराच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस पलटल्याने अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस निरीक्षक पवार पोलीस उपनिरीक्षक किशोर यादव, देहूरोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पठाण आणि त्यांचे सहकारी कर्मचारी तसेच देवदूत यंत्रणा घटनास्थळी पोहोचत मदत कार्य सुरू केले.
बसच्या झालेल्या अपघातात सर्व प्रवासी जखमी झाले होते. यामध्ये दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारार्थ रावेत येथील एका खासगी रुग्णालयात 11, तर सोमटणे फाटा येथील पवना रुग्णालयात 17 जखमींना दाखल करण्यात आले. काही किरकोळ जखमी रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले होते.घटनेनंतर वाहन चालक व वाहक घटनास्थळावरून पसार झाले. जखमींची माहिती घेऊन देहूरोड पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.