धोकादायक वीज यंत्रणेची घेणार तत्काळ दखल
पुणे – जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात वीजेच्या दुर्घटना रोखण्यासाठी महावितरण सरसावले असून वीजसुरक्षेला धोका निर्माण झालेल्या प्रकारांची दखल घेण्यासाठी महावितरणकडून “व्हॉटस् ऍप’ मोबाइल क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांना एक फोटो काढून तातडीने तक्रार करता येणार आहे.
पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी 7875767123 तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी 7875768074 हा व्हॉटस् ऍप मोबाइल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यासाठी या क्रमांकावर फक्त वीजवितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती, तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. या क्रमांकावर नागरिकांना कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉटस् ऍपद्वारे माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणचे प्रभारी पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.