कात्रज – पुणे लोकसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पाच जणांनी उमेदवारी मागितली आहे. या पाच जणांची यादी पुणे प्रभारी अमित ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सोपविली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेही आपला उमेदवार लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तेवढाच सक्षम उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मनसेही मागे नसल्याच यावरून दिसत आहे.
मनसेतर्फे प्रामुख्याने इच्छुक असलेले माजी नगरसेवक वसंत मोरे, साईनाथ बाबर, बाबू वागसकर, किशोर शिंदे, गणेश सातपुते यांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी आपली दावेदारी यापूर्वीच जाहीर केली आहे. तर बाबू वागस्कर, किशोर शिंदे आणि गणेश सातपुते हे देखील पुणे मनसेतील मोठी नावे असल्याने मनसेची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे विरोधीपक्षाचेही लक्ष असणार आहे.
मनसे राज्यातील मोजक्याच जागा लढविणार आहे. त्यात पुणे लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालून या मतदारसंघाची जबाबदारी अमित ठाकरे यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे मनसेचा उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता लागली आहे.