पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका, पीएमआरडीए आणि एमएसआरटीसीकडून उभारण्यात येत असलेले रिंगरोड रस्त्यांनी जोडण्यासाठी महापालिकेकडून “मिसिंग लिंक’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत पीएमआरडीएकडून शहराच्या हद्दीत करण्यात येत असलेल्या 64 मीटरच्या अंतर्गत रिंगरोडला प्रमुख रस्ते जोडले जाणार आहेत. पाच टप्प्यात हे काम केले जाणार असून त्यात शहरातील प्रमुख 21 रस्त्यांचा समावेश आहे. पाच टप्प्यात हे काम केले जाणार असून सुमारे 21 किलोमीटरच्या जोड रस्त्याचे जाळे तयार करून वाहतूक कोंडी फोडली जाणार आहे. शहरात गेल्या काही वर्षात वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात वाढली असून ही कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून वाहतूक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती. या सल्लागारांकडून हा मिसिंग लिंकचा अहवाल करण्यात आला असून महापालिका प्रशासनाकडून त्याबाबतच्या बैठकाही सुरू करण्यात आल्या आहेत.
काय आहे प्लॅन
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरात तीन रिंगरोड प्रस्तावित आहेत. त्यात, शहराबाहेर 110 मीटरचा रिंगरोड राज्य महामार्ग प्राधिकरण विकसित करणार आहे. तर, 65 मीटरचा रिंगरोड पीएमआरडीए करणार आहे. त्या खालोखाल 24 मीटरचा एचसीएमटीआर रस्ता महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका करणार आहे. या रस्त्यांसाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने भविष्यात ते होण्यास उशीर होणार आहे. अशावेळी शहरातील वाहतूक कोंडी वाढतच असून ती फोडण्यासाठी पालिकेने “मिसिंग लिंक’ प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत पाच टप्पात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पात सुमारे 21 रस्ते एकमेकांना जोडले जाणार असून त्याची एकूण लांबी 23 किलोमीटरची असणार आहे.
टप्पा 1 – कोथरूड, पाषाण-बाणेर हा भाग दोन बोगदे आणि तीन डीपी रस्त्यांनी जोडला आहे. या भागात पाषाण आणि बाणेरकडे जाण्यासाठी सध्या चांदणी चौक आणि पुणे विद्यापीठ चौकातून जावे लागते. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे कोथरूड ते पाषाण बोगद्याने जोडल्यानंतर पुढे सुस-बाणेर-पाषाण असे वर्तुळाकार डीपी रस्ते विकसित केले जातील. त्यामुळे बावधन गाव आणि पाषाणमधील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.
टप्पा 2 सऱ्या टप्प्यात कर्वे रस्ता आणि पौड रस्ता टेकडीच्या बाजूने जोडला आहे. पुढे कर्वेनगरमधून सिंहगड रस्त्याकडे उड्डाणपूल केला जाईल. तर सिंहगड रस्ता सातारा रस्त्याला जोडण्यासाठी तळजाई टेकडी येतून बोगदा केला जाईल. त्यामुळे सारसबाग आणि नवले ब्रीज परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होईल.
टप्पा 3या टप्प्यात सातारा रस्ता सोलापूर रस्त्याला जोडला जाईल. या रस्त्याला तीन ठिकाणी जोडले जाईल. हे रस्ते महापालिकेने विकसित केलेले असले तरी काही ठिकाणी ते अर्धवट स्वरूपात आहेत. ते पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील अंतर्गत रस्त्यावरील ताण कमी होणार आहे.
टप्पा 4 या टप्प्यात सोलापूर रस्ता नगर रस्त्याला पर्यायी रस्त्यांनी जोडला जाणार आहे. त्यात, ऍमेनोरा टाऊनशिपपासून केशवनगर-खराडीला जोडणारा आणखी एक उड्डाणपूल उभारला जाईल. त्यानंतर हाच रस्ता पुढे मांजरी कडून फुरसुंगीला जोडला जाईल. त्यामुळे या भागातून नगर रस्त्याकडे जाण्यासाठी आणखी एक पर्यायी रस्ता तयार होईल.
टप्पा 5 या टप्प्यात नगररस्ता जुन्या पुणे-मुंबई महार्मागास जोडला जाईल. त्यात खराडीतून थेट धानोरी तसेच लोहगावला जाण्यासाठी रस्ता विकसित केला जाईल. तर होळकर पूलाकडून हॅरिस ब्रीजकडे जाण्यासाठीही पर्यायी रस्ते उपलब्ध केले जातील.