“किसनवीर’च्या निवडणुकीत मदन भोसले यांना धक्का
सातारा- किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील राजकीय घडामोडींना दिवसेंदिवस वेग येत आहे. दोन विद्यमान संचालक, एक माजी संचालक, एक माजी पंचायत समिती सदस्य यांनी रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने माजी आमदार मदन भोसले यांचा जोरदार धक्का बसला आहे.
विद्यमान संचालक सचिन साळुंखे, राहुल घाडगे, माजी संचालक संदीप पोळ, माजी पंचायत समिती सदस्य कुमार बाबर यांनी मदन भोसले यांचा गट सोडून आ. मकरंद पाटील व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या गटात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. किसन वीर कारखाना निवडणुकीबाबत रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आ. मकरंद पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, बाबासाहेब कदम यांनी याबाबत माहिती दिली.
आ. पाटील म्हणाले, किसन वीर कारखाना अडचणीत आणण्यात विद्यमान चेअरमन मदन भोसले यांचा मोठा वाटा आहे. एकाधिकारशाहीमुळे हा कारखाना संकटात सापडला असून, त्यांच्याच जवळचे लोक आज त्यांना सोडून आम्हाला साथ देत आहेत. सभासद, कामगार सोडाच, पण त्यांच्याबरोबर कित्येक वर्षे काम केलेली मंडळीही आज त्यांना वैतागली आहेत. कारखाना अडचणीत असला तरी आम्ही पाच तालुक्यांमधील सभासदांना वाऱ्यावर सोडणार नाही.
सहकाराच्या माध्यमातूनच हा कारखाना चालवण्यावर आपला भर राहणार आहे. मदन भोसले यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सचिन साळुंखे, राहुल घाडगे, संदीप पोळ व कुमार बाबर यांनी आमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात आणखी काही मंडळी आमच्याबरोबर येतील, असा विश्वास नितीन पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, चार दिग्गजांनी साथ सोडल्याने मदन भोसले यांना कारखाना निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.