पुणे- संपूर्ण भारतातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची “चेअर ऑफ एक्सलेन्स’साठी निवड करण्याचे महत्त्वाचे कारण हे विद्यापीठाकडे असणारी बौद्धिक संपदा आहे. याद्वारे लष्करी इतिहास सर्वांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने विद्यापीठाबरोबर करार करण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मयांक तिवारी यांनी व्यक्त केले.
भारत सरकारचे संरक्षण मंत्रालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग यांच्यात “चेअर ऑफ एक्सलेन्स’साठी सामंजस्य करार झाला. या करारावर शुक्रवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी 2 कोटी रुपयांचा धनादेशही प्रातिनिधीक स्वरूपात संरक्षण मंत्रालयाकडून प्रदान करण्यात आला. त्यावेळी मयांक तिवारी बोलत होते. यावेळी लष्करी प्रशिक्षण विभाग संचालक एस. गोपाल कृष्णा, लष्करी इतिहास विभागाचे डॉ. ए. के. मिश्रा, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, संरक्षण व सामरिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते.
मयांक तिवारी म्हणाले, लष्कराविषयीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी या हेतूने आम्ही हा करार केला आहे. सद्य:स्थितीवर जिथे मोठ्या प्रमाणात संशोधन केले जाते अशा विद्यापीठाला आम्ही हे काम सोपवले असून भविष्यात असे अनेक कार्यक्रम विद्यापीठासोबत राबविण्यात येतील.
विभागप्रमुख डॉ. विजय खरे म्हणाले, विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाला या “चेअर ऑफ एक्सलेन्स’च्या माध्यमातून सुरुवातीच्या तीन वर्षांसाठी 2 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आतापर्यंत भू-सेना, वायू सेना आणि संरक्षण मंत्रालय अशा तीन विभागाला “चेअर ऑफ एक्सलेन्स’ मिळाले आहेत.
भारताचा वसाहतपूर्व काळापासूनचा लष्करी इतिहास आजच्या तरुण पिढीला माहीत व्हावा यासाठी या कराराच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. पुढील तीन वर्षांत हा लष्करी इतिहास विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन साहित्य, पुस्तके, व्याख्यानांद्वारे लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू