पुणे -पुणेकरांसाठी स्वप्नवत ठरणाऱ्या मेट्रो प्रकल्पातील भूमीगत मार्गाची पहिली यशस्वी चाचणी महामेट्रोकडून घेण्यात आली. जमिनीखाली 100 फूट खोल असलेल्या बोगद्यातून मेट्रोने चाचणीसाठी 3 किलोमीटरचा यशस्वी प्रवास पूर्ण केला. रेंजहील डेपो ते रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक आणि त्यानंतर रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर मेट्रो स्थानक त्यानंतर सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक अशी ही चाचणी घेण्यात आली. मेट्रोकडून या मार्गासाठीच्या बोगद्याची खोदाई 4 जून 2022ला पूर्ण करण्यात आली होती, त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत ही चाचणी घेत घेत मेट्रो प्रकल्पाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा केला आहे.
मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या 15.4 कि.मी.च्या मार्गामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा 6 कि.मी. मार्ग भुयारी आहे. या भूमिगत मार्गाच्या भुयाराचे काम दि. 4 जूनला टनेल बोअरिंग मशीनच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आले, त्यानंतर मेट्रोच्या भुयारामध्ये ट्रक, ओव्हर हेड विद्यूत तारा आणि सिग्नलिंगची कामे करण्यात आली. 85 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे अत्यंत्य वेगाने सुरू आहेत.
चाचणी अशी पार पडली…
मंगळवारी दुपारी 3:00 वाजता रेंजहील डेपो येथून भूमिगत मार्गाची चाचणी सुरू झाली. रेंजहील डेपो ते रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक अशा रॅम्पवर वाटचाल करीत स्थानकापर्यंत ट्रेन पोहचली. तेथे ड्रायव्हरने आपला कक्ष बदलला व मेट्रो ट्रेन रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकातील भूमिगत स्थानकापर्यंत पोहचली. या चाचणीसाठी गेल्या आठवड्यापासून मेट्रोचे ट्रक, विद्युत, सिग्नलिंग, देखरेख व संचालन असे सर्व विभाग सतत कार्यरत होते. या चाचणीला 30 मिनिटे वेळ लागला. ही चाचणी यशस्वी झाल्याने मार्च 2023 पर्यंत मेट्रोकडून वनाज ते सिव्हिल कोर्ट आणि सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड महापालिका असा मेट्रो मार्ग सुरू केला जाणार आहे. परिणाम, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणारा नवा सार्वजनिक वाहतुकीचा अध्याय सुरू होणार असून या सेवेमुळे दोन्ही शहरांतील खासगी वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.
आजची भूमिगत मेट्रो चाचणी ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आणि किचकट होती. यासाठी पुणे मेट्रोचे कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत होते. त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. पुणे मेट्रोचे 85 टक्के पूर्ण झाले असून एक-एक टप्पा पार पाडत ती पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. काही महिन्यांत फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि गरवारे ते सिव्हिल कोर्ट या मार्गांची कामे पूर्ण करून तो मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल.
– डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
बोगदा असा तयार केला…
भूमिगत मार्गाचे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असते. बोगदा बनविताना मोठ्याप्रमाणावर निघणारे दगड-गोटे यांना जमिनीखाली साधारणतः 70 ते 80 फुटापर्यंत आणून त्यांची योग्यरीत्या व योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावावी लागते तसेच भुयारी स्थानकांसाठी “कट ऍन्ड कव्हर’ तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे खोदून खालून बांधकाम करीत वर न्यावे लागते. शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट ही अत्यंत्य गजबजलेली ठिकाणे असून या भागांतून सामानाची ने-आण करणे अत्यंत जिकरीचे आहे. या ठिकाणी सामान वाहतुकीची वाहने रात्री 12 ते सकाळी 5 या वेळातच ने-आण करत होती, अशा आव्हानात्मक परिस्थितीत काम करीत मेट्रोने रेंजहील ते सिव्हिल कोर्ट यातील भूमिगत मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आणले.