पुणे -“गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया’ या जयघोषात व मंगलमय वातावरणात टिळक पंचांगानुसार गणरायाचे रविवारी केसरीवाड्यात आगमन झाले. रविवारी दुपारी 12.20 वाजता गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. “केसरी’चे विश्वस्त डॉ. रोहित टिळक आणि डॉ. प्रणती रोहित टिळक यांच्या हस्ते “श्रीं’ची प्रतिष्ठापना झाली. रमणबाग चौकातून सकाळी 9.45 वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. पालखीत बाप्पा विराजमान झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरूवात झाली. पावसाच्या हलक्या सरींमुळे ढोल-ताशा पथकातील वादकांत उत्साह संचारला होता. ओंकारेश्वर मंदिर चौक, वर्तक उद्यान, नारायणपेठ पोलिस चौकी आणि केळकर मार्गाने मिरवणूक केसरीवाड्यात आली.
डॉ. दीपक टिळक, डॉ. रोहित टिळक, डॉ. प्रणती टिळक, व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक, विविध विभागांतील कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले होते. पथकांच्या वादनाने गणेशभक्तांचा आनंद द्विगुणीत झाला. बिडवे बंधूंच्या चौघडा वादनाने वातावरण अधिक मंगलमय झाले. यावेळी अभिनव कलाभारतीतर्फे आकर्षक रांगोळी साकारण्यात आली होती. “श्रीं’चे टिळकवाड्यात आगमन होताच गणेशभक्तांनी “बाप्पा मोरया’चा जयघोष केला. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिपसिंग गील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. प्रतिष्ठापनेच्या वेळी कौस्तुभ खळीकर यांनी पौरोहित्य केले.