पुणे – महावितरणच्या सर्व औद्योगिक ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी पुणे परिमंडल अंतर्गत रास्तापेठ, गणेशखिंड व पुणे ग्रामीण मंडलस्तरावर स्वतंत्र स्वागत सेल कार्यान्वित करण्यात आले. यामुळे तक्रारीचे प्रमाण कमी होत आहे. पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या हस्ते या सेलचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्यासह उद्योजक व औद्योगिक संघटना प्रतिनिधींची उपस्थिती होती.
रास्तापेठ येथे ‘प्रकाशदूत’ सभागृहात आयोजित कार्यक्रमात महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योजक, औद्योगिक संघटना प्रतिनिधी यांच्यात संवाद कार्यक्रम झाला. यावेळी स्वागत सेलबाबत सादरीकरणातून सविस्तर माहिती देण्यात आली. तत्पर ग्राहकसेवा व पायाभूत वीजयंत्रणेचे विस्तारीकरण, सक्षमीकरणामुळे औद्योगिक ग्राहकांमध्ये महावितरणबाबत विश्वासार्हता वाढीस लागली आहे. पूर्वीपेक्षा वरिष्ठ पातळीवर खुला संवाद व संपर्क वाढला आहे. तात्काळ उपाययोजनांमुळे तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. या तीनही स्वागत सेलमुळे ग्राहकसेवेचे आणखी तत्पर व्यासपीठाचे स्वागत आहे,’ असे प्रातिनिधिक मनोगत उद्योजक व औद्योगिक प्रतिनिधींनी व्यक्त केले.
मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले, पुणे परिमंडलामध्ये एमआयडीसी विद्युत सुधारणा योजनेतून ४५ कोटींच्या पायाभूत वीजयंत्रणेची विविध कामे वेगाने सुरू आहेत. सोबतच औद्योगिक ग्राहकांसाठी आणखी १०० कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मंजूरीनंतर त्यातील सर्व कामे येत्या मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.