पुणे- शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील अवघड क्षेत्र शाळांची यादी जिल्हा परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यात 768 अवघड क्षेत्रातील शाळांचा समावेश आहे. त्यानुसार संबंधित शिक्षकांचा काही आक्षेप किंवा हरकती असल्यास येत्या 22 मार्चपर्यंत शिफारशीसह माहिती जिल्हा परिषद कार्यालयास सादर करावी, असा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबाबत शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामध्ये अवघड क्षेत्र निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सर्व तालुक्यांतील गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. त्यानुसार तालुक्यातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 768 अवघड क्षेत्रातील शाळा असून, त्यामध्ये मावळ तालुक्यात सर्वाधिक 152 शाळांचा समावेश आहे. वेल्हे तालुक्यात 116, मुळशी आणि खेडमध्ये प्रत्येकी 102, आंबेगाव येथे 101, जुन्नर तालुक्यात 90, भोरमध्ये 74 तर पुरंदर तालुक्यात 31 शाळांचा समावेश आहे. अवघड क्षेत्रातील शाळांची सविस्तर माहिती जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली असून, संबंधित शिक्षकांनी ती पाहून छाननी करून सविस्तर माहिती शिफारशीसह कार्यालयास पाठवावी. त्यानंतर अवघड क्षेत्र शाळांची अंतीम यादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे सीईओ यांनी सांगितले.
8 तालुक्यांत अवघड क्षेत्र शाळा
जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये अवघड क्षेत्र शाळांच समावेश आहे. तर 5 तालुक्यांत एकही अवघड क्षेत्र शाळा नाही. त्यामध्ये बारामती, दौंड, हवेली, इंदापूर आणि शिरूर या तालुक्यांचा समावेश आहे. तर आंबेगाव तालुक्यात 101, भोरमध्ये 74, जुन्नर तालुक्यात 90, खेड येथे 102, मावळमध्ये 152, मुळशीत 102, पुरंदर 31, वेल्हे 116 अवघड क्षेत्र शाळा आहेत. पुरंदर तालुक्यातील काही शाळांची माहिती येणे बाकी असून, अंतीम यादीमध्ये या शाळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.