पुणे –सर्व रास्तभाव दुकानदारांना धान्याच्या चलनाचे पैसे भरण्यासाठी परिमंडल कार्यालयात जावे लागते. या कार्यालयातून घेतलेली चलनाची प्रत बॅंकेत भरणा करावी लागते. ही पद्धत अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दुकानदारांना दोन दिवसांचा वेळ लागत होता. यासर्व पार्श्वभूमीवर आता रेशन दुकानदारांची चलनेदेखील ऑनलाइन भरण्याची सुविधा शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. यासुविधेमुळे नागरिकांना लवकर रेशनवरील धान्य मिळणार आहे.
यासुविधेमुळे रेशनदुकानदारांचा तसेच परिमंडल कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे. पुणे शहर व त्याअंतर्गत येणारी 11 परिमंडल कार्यालयांना येथून पुढे ही चलने ऑनलाइन पद्धतीने भरली जावी, अशा सूचना पुरवठा विभागाचे उपायुक्त यांनी दिल्या होत्या. त्यानुसार या आदेशाची अंमलबजावणी शहरात सुरू झाली आहे. परिमंडळ ह आणि म कार्यालयात अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला आहे. परिमंडळ अधिकारी ह व म विभागप्रमुख गजानन देशमुख यांनी एकूण 111 रास्तभाव दुकानांपैकी 109 रास्तभाव दुकानांचे चलन ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले आहे.