सहरकानगर : भारतीय वारकरी मंडळ आयोजित भव्यदिंडी सोहळा मध्ये उपस्थित वारकरी.
सहकार नगर – भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या दिंडी सोहळ्यात टाळमृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा- तुकाराम’चा जयघोषाने लक्ष्मी रस्ता, डेक्कन परिसर दुमदुमून गेला. या दिंडी सोहळ्यात पुणे शहर आणि परिसरातील शेकडो वैष्णव सहभागी झाले होते.
श्री एकनाथी भागवत ग्रंथाला ४५० वर्ष, संत नामदेव महाराज जन्मोत्सवाला ७५१ वर्ष, संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला ३७५ वर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याभिषेकाला ३५० वर्षे झाल्याचे औचित्य साधून भारतीय वारकरी मंडळाच्या वतीनेया भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरापासून या सोहळ्याला प्रारंभ झाला. तेथून लक्ष्मी रस्त्याने श्री सद्गुरू खंडूजी बाबा विठ्ठल मंदिर चौक येथे सोहळ्याची सांगता झाली.
यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी देवाची चे विश्वस्त मंडळ, संत एकनाथ महाराज वंशज योगेश महाराज पालखी वाले, योगीराज महाराज गोसावी, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र धंगेकर, धीरज घाटे, हेमंत रासने, मिलिंद एकबोटे, प्रमोद भानगिरे, युवराज गाडवे, शिरीष मोहिते आदी उपस्थित होते, अशी माहिती भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष संदीप पळसे यांनी दिली.