पुणे (संजय कडू)- शहरालगतच्या कात्रज घाट आणि नवीन बोगदा परिसर तसा निसर्गरम्य आहे. पण, गेल्या काही वर्षांत या घाट आणि बोगद्यांचा परिसर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा “हॉटस्पॉट’ झाला आहे. दाट झाडी आणि घाट असल्याने गुन्हेगार तेथून पसार होत आहेत. अशा घटनांचा तपास करणे आणखी सोपे व्हावे, यासाठी तेथे सीसीटीव्ही बसवावेत, अशी सूचना पुणे पोलिसांनी सा. बां. विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिली आहे.
गुन्हेगारांची “मोडस ऑपरेंडी’
खून एका ठिकाणी करायचा आणि मृतदेहाची विल्हेवाट कात्रज घाटात लावायची, अशी पद्धत गुन्हेगारांनी अवलंबली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी असे अनेक मृतदेह झाडाझुडपांतून शोधले आहेत. तर, दुसरीकडे “हिट अँड रन’ अपघातांत अनेकांचा मृत्यू दोन्ही घाट रस्त्यांवर झालेला आहे. या प्रकरणात पोलिसांना गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. याचे मुख्य कारण म्हणजे दोन्ही घाटांत सीसीटीव्ही नाहीत.
शहरात सीसीटीव्ही ठरताहेत उपयोगी
शहरात जवळपास अडीच हजारांच्या आसपास सीसीटीव्ही आहेत. त्यांमुळे अपघात आणि इतर गुन्ह्यांचा माग काढण्यासाठी उपयोग होत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि खुनाच्या गुन्ह्यातील संशयित तसेच हिट अँड रन प्रकरणांमध्ये गुंतलेल्या वाहनांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरील दिवे तसेच सीसीटीव्ही लावण्याची विनंती पुणे पोलिसांनी केली आहे.
घाट परिसरात पथदिवे तसेच सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवला आहे. पुणे शहर आणि इतर लगतच्या घाट परिसरांत खुनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. गुन्हेगार एखाद्या व्यक्तीची हत्या करतात आणि नंतर मृतदेह घाटात फेकून देतात. या घटनांना आळा बसू शकतो किंवा सीसीटीव्ही बसवल्यास पोलिसांना आरोपींचा माग काढणे सहज शक्य होईल.
– सागर पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-2
मागील वर्षी 6 खून, 16 अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “सन 2021 मध्ये भारती विद्यापीठ पोलिसांनी नवीन घाट विभागात पाच खुनाचे गुन्हे नोंदवले. तर जुना घाट विभागात खुनाचा एक गुन्हा दाखल झाला. नवीन घाट विभागात 12, तर जुन्या घाटात 4 जीवघेणे अपघात झाले आहेत. पुणे-सातारा महामार्गावरील दोन्ही घाट हे महत्त्वाचे मार्ग आहेत.
महामार्ग प्रशासन म्हणते…
“कात्रज नवीन घाटाचे व्यवस्थापन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. त्यांनी नवीन बोगद्याकडे जाणाऱ्या घाट विभागात पथदिवे बसवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. नवीन बोगदा आणि परिसरात सीसीटीव्ही बसवले जात आहेत. पोलिसांनी सांगितलेली मोक्याची सर्व ठिकाणे सीसीटीव्हीद्वारे कव्हर केली जातील. सीसीटीव्ही कोठे लावायचे, ते कंट्रोल रूमशी कसे जोडायचे या काही समस्या होत्या. त्यांचे निराकरण झाले आहे. बोगद्याजवळील कॅमेरे लवकरच कार्यरत होतील,’ असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.