येरवडा – करोनामुळे आवश्यक कामासाठी निधी मिळत नसल्याची नगरसेवकांची तक्रार असताना प्रभाग क्र.6 मध्ये मात्र चौक सुशोभीकरणासाठी निधीची उधळपट्टी सुरू असल्याचे तसेच क्षेत्रीय कार्यालयस्तरावर “विविध ठिकाणी कामे करणे’, या हेड खाली नगरसेवकांच्या “स’यादीतून कामे केली जात आहेत. ही कामे खरोखरच गरजीची आहेत का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
येरवडा प्रभाग क्र. 6 येथे स्व.बिंदुमाधव ठाकरे चौकात नगरसेवक संजय भोसले यांच्याद्वारे काम सुरू आहे. पादचाऱ्यांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचा भंग न करता काम करण्यात यावे, असा पथ विभागाने अहवाल दिला आहे. मात्र, नियम मोडूनच हे काम सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयाकडे करूनही वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. ज्या प्रभाग क्र.6 मध्ये ड्रेनेजलाइनच्या समस्येचा तारांकित प्रश्न आमदार सुनील टिंगरे यांनी विधानसभेत विचारला त्यावर शिवसेनेच्या नगरविकास मंत्र्यांना ही समस्या असून ती सोडवण्यात येईल, असे उत्तर द्यावे लागले होते. याच प्रभागात स्वच्छतागृहाचा प्रश्न गंभीर असताना अशा कामांऐवजी निधी दुसरीकडे खर्च करण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या चौकातील सुशोभीकरण करण्यासाठी महापलिकेच्या सर्व विभागाच्या परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत. पादचाऱ्यांना जाण्यासाठी पुरेशी जागा ठेवण्यात आलेली आहे. नियमानुसारच काम सुरू आहे. कोणी आक्षेप घ्यावा, असे काहीच कारण नाही.
– संजय भोसले, शिवसेना, नगरसेवक प्रभाग क्र.6
नगरसेवक संजय भोसले यांच्या “स’यादीतून हे काम सुरू असून नियमभंग न करता काम करण्याची परवानगी पथविभागाने दिली होती. झाड तोडले याबाबत अहवाल आला असून संबंधित ठेकेदारास नोटीस देण्यात येईल.
– महेंद्र बहिरम, उपअभियंता, येरवडा क्षेत्रीय कार्यालय