पुणे – शहरात करोना बाधितांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आल्याने शहर अखेर कंटेन्मेंट मुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 10 महिन्यानंतर प्रथमच पुणेकर खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत. त्यामुळे पुणेकरांसाठी ही खऱ्या अर्थाने नववर्षभेट ठरली आहे.
मार्चमध्ये राज्यातील करोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता. दुबई येथून परतलेल्या दाम्पत्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. नंतर, मुंबईसह राज्यात सर्वत्र करोनाचा संसर्ग वेगाने पसरला. सुरूवातीला मुंबई हा करोनाचा हॉटस्पॉट बनला होता. मात्र, नंतर राज्यामध्ये पुण्यातील बाधितांची संख्या ही सर्वाधिक झाली. याशिवाय पुण्यातील मृत्यूदरही जास्त असल्याने चिंतेत भर पडली. डिसेंबरच्या सुरूवातीला पुण्यात 6 कंटेन्मेंट झोनची घोषणा करण्यात आली होती. त्याआधी नोव्हेंबरमध्ये ही संख्या 13 होती, तर ऑक्टोबरमध्ये पुण्यात 33 कंटेन्मेंट झोन होते.
सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जेव्हा करोनाचा कहर होता, त्यावेळी कंटेन्मेंट झोनची संख्या 100 पर्यंत गेली होती. या सगळ्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणांचे अथक प्रयत्न, महापालिका, राज्यसरकारने केलेल्या उपाययोजना यामुळे करोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी बऱ्याच अंशी यश मिळाले आहे.
करोनावरील उपचारासाठी तातडीने जम्बो रुग्णालयासारखी व्यवस्था उभी करण्यात आली. लॉकडाऊन तसेच सोशल डिस्टन्सिंगबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी पोलीस यंत्रणेचाही सहभाग महत्त्वाचा ठरला. करोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने बुधवारीच शिवाजीनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जानेवारीपासून या कोविड सेंटरमध्ये नवीन रुग्ण दाखल करून घेतले जाणार नाहीत.
या नंतर आता कंटेन्मेंट झोन काढून टाकल्याची बातमीही दिलासा देणारी ठरली आहे. महापालिका हद्दीत आता एकही कंटेन्मेंट झोन नसून पुणे कंटेन्मेंट झोनमुक्त शहर बनले आहे, असे पालिकेकडून आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.