पुणे – सध्याचे विमानतळावरील टर्मिनल केवळ 22 हजार चौरस मीटर आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासी आणि विमान कंपन्यांची गैरसोय होत आहे. विमानतळ प्राधिकरणाने पाच लाख चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले इंटिग्रेटेड टर्मिनल बांधण्यात येणार आहे. हे टर्मिनल 2022 पर्यंत खुले होणार आहे.
खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. बापट यांनी नुकतीच नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन विमानतळ विस्तारीकरणाबाबत निवेदन दिले होते.
या टर्मिनलचे बांधकाम 2018 पासून सुरू केले आहे. यातील 61 टक्के काम पूर्ण झाले असून, ऑगस्ट 2022 पर्यंत ते पूर्ण होणार आहे. विमानतळावर पार्किंगसाठी जागेची कायम समस्या राहिली आहे. नव्या इमारतीमुळे त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. या इमारतीत प्रवाशांना विमानापर्यंत पोहोचविणारे 5 नवीन मार्ग, 8 स्वयंचलित जिने (एस्केलेटर), 15 लिफ्ट, 34 चेक-इन काउंटर आदी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विमान प्रवास अधिक सुखकर होणार
लोहगाव विमानतळ हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे विमानतळ आहे. भोवतालच्या दहा जिल्ह्यांना ते जोडणारे आहे. पुणे आणि परिसरात उद्योगांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांना चांगली सुविधा देणारे टर्मिनल गरजेचे होते. या टर्मिनलमध्ये दरवर्षी 80 लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुसज्ज टर्मिनलची गरज होती. ती आता पूर्ण होणार आहे. या विमानतळ विस्तारीकरणासाठी गेली तीन वर्षे प्रयत्नशील आहे. हे काम लवकरच पूर्ण होऊन नागरिकांचा विमान प्रवास अधिक सुखकर होणार असल्याचे बापट म्हणाले.