पुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’

12, 544 विद्यार्थ्यांचा सात दिवसांत प्रवेश : 26 एप्रिलपर्यंतच प्रवेशासाठी मुदत

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याद्वारे “आरटीई’अंतर्गतच्या 25 टक्के प्रवेशासाठी पहिल्या टप्प्यात लॉटरी लागलेल्या पालकांना शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी 26 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आत्तापर्यंत गेल्या सात दिवसांत 12 हजार 544 पालकांनी आपल्या मुलांचा शाळेत प्रवेश घेतला आहे. पडताळणी समितीकडून कागदपत्रांची कसून तपासणी केली जात असल्याने पालकांचे टेन्शनही वाढते आहे.

राज्यभरात 9 हजार 195 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 779 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासाठी 2 लाख 44 हजार 933 अर्ज प्राप्त झाले आहेत. 8 एप्रिल रोजी राज्यस्तरीय लॉटली काढण्यात आली. पहिल्या टप्प्यात 67 हजार 706 जणांना लॉटरी लागली आहे. या लॉटरी लागलेल्या पालकांना पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करुन शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत पालकांना प्रवेशाची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

“आरटीई’ सर्व प्रवेशांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकूण चार फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यातील एक फेरी आता सुरू आहे. उर्वरित फेऱ्या मेमध्ये होणार आहेत. पहिल्या फेरीसाठी रहिवाशी पत्तापासूनच्या 1 कि.मी.पर्यंतच्या शाळा प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. यानंतर 1 ते 3 कि.मी., 3 कि.मी.च्या पुढील अंतरावरील शाळांच्या प्रवेशासाठी संधी देण्यात येणार आहे. काही पालकांकडून हवी ती शाळा मिळत नसल्याने प्रवेश घेण्यास नकारही देण्यात येऊ लागला आहे.

पालक कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी पडताळणी समित्यांच्या कार्यालयांकडे धाव घेऊ लागले आहेत. रहिवासी पुरावा, उत्पन्न, जात, मुलांचा जन्म दाखला आदी कागदपत्रांची तपासणी प्रामुख्याने समितीकडून करण्यात येत आहे. कागदपत्रे अपूर्ण असणाऱ्यांना प्रवेश नाकारला जात आहे. काही पालकांकडून संशयास्पद कागदपत्रे सादर केली जात असल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे.

पडताळणी समितीचे सर्वच्या सर्व सदस्य कार्यालयात उपस्थित नसतात. यामुळे दिवसभर कागदपत्र तपासणीसाठी ताटकळत उभारावे लागत आहे. यासह विविध बाबतीच तक्रारी पालकांकडून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात येऊ लागल्या आहेत. या तक्रारी सोडविण्यात येतील, असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुळ लाभार्थ्यानाच प्रवेश मिळावा या दृष्टीनेच कामकाज पध्दत राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

एजंट मंडळी सक्रीय
“आरटीई’अंतर्गत पाहिजे त्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी काही ठिकाणी एजंटही सक्रीय झाले आहेत. ते पालकांकडून भरमसाठ रक्कमेची मागणीही करू लागले आहेत. याबाबतच्या तक्रारी संघटना व पालकांकडून प्राप्त झाल्या आहेत. दोन एजंटाची नावे समजली असून त्यांना सापळा रचून पकडण्यात येणार असून त्यांच्या विरुध्द पोलीसांकडे तक्रार दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.