पुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’

फक्‍त 27 प्रवेश : 22 जणांनाच मिळाला रोजगार

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रातून गेल्या वर्षी 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यातून 22 विद्यार्थ्यांना या केंद्रातून रोजगार प्राप्त झाल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. या केंद्रात अनेक अभ्यासक्रम कार्यरत असूनही प्रवेशित व रोजगारप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या कमीच असल्याचे दिसून येत आहे.

सिनेट सदस्य अभिषेक बोके यांनी कौशल्य विकास केंद्रावर प्रश्‍न उपस्थित केला. त्यांनी या केंद्राची सद्यस्थिती, किती अभ्यासक्रम कार्यरत आहेत आणि किती जणांना रोजगार मिळाला, असा प्रश्‍न होता. त्यावर विद्यापीठाने तपशीलवार उत्तरे दिली. विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजनेंतर्गत बी. व्होक इन ऑटोमोटिव्ह ऑटोमेशन, रिन्व्हेबल इनर्जी, आयटी, रिटेल मॅनेजमेंट, ज्वेलरी डिझाईन ऍन्ड जेमोलॉजी हे पाच अभ्यासक्रम कार्यरत आहेत. शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून बी.व्होक ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्‍चरिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये बी. व्होक अभ्यासक्रमात 27 पैकी 22 विद्यार्थ्यांना रोजगार मिळाल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

महाविद्यालयात क्रेडिट सिस्टिम
प्राचार्य मनोहर चासकर यांनी महाविद्यलायांत क्रेडिट सिस्टिम सुरू होणार आहे का, असा प्रश्‍न विचारला. त्यावर विद्यापीठाने महाविद्यालयात ही सिस्टिम सुरू करण्याचा मानस असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पदव्युत्तर विभागात क्रेडिट सिस्टिम लागू करण्यात आले असून, अभियांत्रिकी विद्याशाखेत पदवीला ही सिस्टिम सुरू केली आहे. त्यानुसार अभ्यासक्रम बदलण्यात येत आहे. तथापि, सर्व विद्याशाखांना ही सिस्टिम सुरू करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहे. मात्र सर्व विद्याशाखांसाठी पदवीस्तरावर ही सिस्टिम सुरू करण्यास अनेक अडचणी आहेत. त्यामुळे पदवीस्तरावर ही सिस्टिम कोणत्या आधारावर सुरू करण्यात येणार आहे, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.