प्रशासकांच्या हस्ते पूजेनंतर होणार विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ
पुणे – दोन वर्षांनंतर यंदा गणेश विसजर्नाची मिरवणूक कोणत्याही निर्बंधाशिवाय होत आहे. यंदा या मिरवणुकीची सुरुवात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते मानाच्या गणपतींची पूजा करून होणार आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच हा मान महापालिका आयुक्तांना मिळणार आहे.
दरवर्षी विसर्जन मिरवणुकीची सुरुवात शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या हस्ते पूजा करून केली जाते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात. मात्र, यावर्षी महापालिका निवडणूक न झाल्याने तसेच राज्यातील सत्ताबदलानंतर अद्याप जिल्ह्यासाठी पालकमंत्रीही नेमण्यात न आल्याने पुजेचा मान महापालिका आयुक्तांना मिळाला आहे.
दरम्यान, सकाळी साडेनऊ वाजता मानाच्या गणपतींची पूजा झाल्यानंतर सकाळी दहा वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मिरवणुकीस सुरुवात होणार आहे.
महापालिकेची तयारी पूर्ण
महापालिकेकडून गणेशोत्सवाच्या विसर्जनासाठी यंदा जय्यत तयारी करण्यात आली आहे, पालिकेकडून शहरातील विसर्जनासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत सुमारे 303 ठिकाणी कृत्रिम हौद, लोखंडी टाक्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय 216 ठिकाणी मूर्ती संकलनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर प्रत्येक विसर्जनाच्या ठिकाणी महापालिकेने निर्माल्य संकलनासाठी यंदा विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
कालवा, नदी, तलावात विसर्जनास प्रतिबंध
महापालिकेकडून यंदा शहरातील नदीपात्र, कालवा तसेच पालिकेच्या तलावांमध्ये विसर्जनास मनाई करण्यात आली. यावर्षी नदीतही पाणी सोडले जणार नाही. तसेच कालव्यातील पाणी पाच दिवसांपासूनच बंद करण्यात आले आहे. याशिवाय तलावांच्या काठावर बॅरीकेडींग करण्यात आले असून, या ठिकाणी नागरिकांना विसर्जनास मनाई असणार असल्याने पालिकेकडून विसर्जनासाठी पर्यायी सुविधा तसेच मूर्ती संकलनाची व्यवस्था असणार आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अग्निशमन दलही सज्ज
विसर्जनाच्या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी नदीकाठी अग्निशमन दलाची यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. प्रत्येक विसर्जन घाटावर जीवरक्षक तैनात करण्यात आले असून, नदीकाठावर दोन्ही बाजूस दोर बांधण्यात आले आहेत. तसेच दुर्घटना घडल्यास नागरिकांनी तातडीने 101 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय विसर्जन घाटांवर तीन शिफ्टमध्ये अग्निशमन दलाचे कर्मचारी कार्यरत असणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडूनही यंत्रणा उभारण्यात आली असून, 020 25501269 अथवा 020- 25506800/ 1/2/3 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
स्वच्छतेसाठी 1300 कर्मचारी
विसर्जन मिरवणूक काळात शहर स्वच्छतेसाठी घनकचरा विभागाने क्षेत्रीय कार्यालयांशी समन्वय साधून विसर्जन मिरवणूक संपताच पुढच्या तीन-चार तासांत शहर चकाचक करण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. या कालावधीत शहरात 1300 स्वच्छता कर्मचारी कार्यरत असणार आहेत. अदर पूनावाला फाउंडेशन, जनवाणी यांसह इतर संस्थाच्या सहभागातून 210 फिरती स्वच्छतागृहे ठेवली आहेत. शहराच्या इतर भागात क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर नियोजनत्यामध्ये 7 हजार 700 कर्मचारी तैनात असणार असणार आहेत. गणेश विसर्जन मिरवणूक जसजशी पुढे जाईल, तसे लगेच स्वच्छतेचे काम सुरू होणार आहे. अदर पूनावाला फाउंडेशनतर्फे कचरा उचलण्यासाठी मशिन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
रात्री उशिरापर्यंत धावणार मेट्रो
विसर्जन मिरवणुकीला दिवसभर आणि रात्रीही पुणेकरांना मेट्रोच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे, ही सेवा केवळ पुणे शहरातील वनाज ते गरवारे मार्गासाठी असणार असल्याचे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले. तर दर अर्ध्या तासाला मेट्रो असणार आहे. महामेट्रोकडून 6 मार्चपासून वनाज ते रामवाडी मार्ग सुरू करण्यात आला आहे. दररोज सकाळी सात ते रात्री दहा या कालावधीत सुरू असते. मात्र, शहराची गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी पर्यंत सुरू असल्याने तसेच रात्री 12 नंतर विसर्जन मिरवणूकीत वाद्य वाजविण्यास बंद करण्यात येत असल्याने त्यानंतर नागरिक घरी परतात. त्यामुळे, मेट्रोकडून शुक्रवारी सकाळपासून शनिवार पहाटे 1 वाजे पर्यंत मेट्रोची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मिरवणुकीत मार्गावर वैद्यकीय मदत केंद्र
शहरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मिरवणुकीत गणेश भक्तांच्या सेवेसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे. शहरातील महत्वाच्या पाच चौकांत वैद्यकीय मदत केंद्र उभारण्यात आले आहेत. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर, रुग्णवाहिका, स्वयंसेवक यांचा समावेश असणार आहे. शहरातील बेलबाग चौक, पूरम चौक टिळक रोड, एसपी कॉलेज, अलका टॉकीज चौक, शनिवारवाडा येथे वैद्यकीय सेवा उपलब्ध असणार आहे तसेच दोन रुग्णवाहिका फिरत्या असणार आहेत. आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई – 9970077773, डॉ. नंदकिशोर बोरसे 9422032696, डॉ. शंतनू जगदाळे 9011916607, डॉ. कुणाल कामठे 9890616365, डॉ.नितीन बोरा 9822969661, सदाशिव कुंदेन 9921574499 या नंबरवर संपर्क साधवा.
“खडकवासला’तून विसर्ग सुरू
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून मुठा नदीत 428 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. आता पुन्हा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. आधी 96 टक्के असलेला पाणीसाठा 100 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. रात्री 11 वाजल्यापासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये, नदीपात्रात वाहने पार्किंग करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची शक्यता आहे.