पुणे – जी-20 परिषदेच्या निमित्ताने हॉटेल जे. डब्ल्यू. मेरियट येथे आयोजित बैठकीनिमित्त प्रदर्शनातील स्टॉल्सना परदेशी पाहुण्यांनी आवर्जून भेट दिली. यावेळी आलेल्या प्रतिनिधींनी भारतीय पारंपरिक उत्पादने आणि महाराष्ट्राच्या पर्यटनस्थळांत ऋची दाखवली. “नमस्ते महाराष्ट्र’ म्हणत यावेळी पाहुण्यांचे पुणेरी आतिथ्य आणि मराठमोळे स्वागत करण्यात आले. तर, ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने बाजरीपासून बनवलेल्या चिप्सची चव घेऊन वाहवा केली.
महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, खादी ग्रामोद्योग, तृणधान्य विषयक, बांबू उत्पादने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, केंद्र शासनाचे आदिवासी सहकारी पणन विकास महासंघ, मुळा, मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आदी प्रदर्शन दालनांना कुतूहलाने परदेशी पाहुण्यांनी भेट दिली.
बांबू उत्पादने आणि हस्तकलेच्या वस्तूंबद्दल आस्थेने माहिती घेतली. “तृणधान्यापासून बनवलेली उत्पादने आरोग्यदायी असून ही उत्पादने आमच्या देशात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा’ असे स्टॉल धारकांना
जी-20 सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सांगितले.