जि.प.निवडणुकीसाठी प्रारूप आराखडा
पुणे – जिल्हा परिषद गण-गट रचनेचा प्रारुप आराखडा जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी प्रसिद्ध केला. हवेली तालुक्यातील गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याचा मोठा फटका या तालुक्याला बसला आहे. हवेली तालुक्यातील तब्बल सात गट आणि 14 गणांवर संक्रांत आली आहे. नवीन रचनेत हवेली तालुक्यात आता केवळ सहा गट आणि 11 गण निश्चित झाले आहेत.
2011च्या जनगणेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 33 लाख 48 हजार 495 आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेसाठी 82 गट तर पंचायत समित्यांसाठी 13 तालुके मिळून 164 गण आहेत. 2017 च्या तुलनेत जिल्हा परिषदेसाठी सदस्यांची संख्या सात ने तर पंचायत समित्यांच्या सदस्यांच्या संख्येत 14ने वाढ झाली आहे.
दरम्यान, गट आणि गणांचा रचनेमध्ये सर्वाधिक तोडफोड शिरूर आणि हवेली तालुक्यात झाली आहे. जुन्नर आणि खेड तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले आहेत. शिरूर तालुक्यामध्ये एका गटाची वाढ होऊन 9 गटांची निर्णय असली तरी प्रत्यक्षात या तालुक्यातील संपूर्ण गट गण रचना बदलली आहे. खेड तालुक्यातील नऊ गटाची रचना बघता या तालुक्यात राज्य निवडणूक आयोगाचे निकष पाळले किंवा कसे असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पुणे जिल्ह्यातील नवीन गट रचनेत आंबेगाव आणि वेल्हे या दोन तालुक्यातील पूर्वीचीच गट आणि गणांची संख्या कायम राहिली आहे. या नव्या गट रचनेचा 10 तालुक्यांना फायदा झाला आहे. फायदा झालेल्या दहापैकी जुन्नर, खेड, दौंड आणि इंदापूर या चार तालुक्यात प्रत्येकी दोन गट आणि प्रत्येकी चार गण वाढले आहेत. सहा तालुक्यात प्रत्येकी एक गट आणि प्रत्येकी दोन गण नव्याने निर्माण झाले आहेत.