पुणे – वीजबिलांसाठी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करत पुणे जिल्ह्यात १ लाख २३ हजार ३९६ पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी केवळ ई-मेल आणि एसएमएसचा पर्याय निवडला आहे. या ग्राहकांनी गो-ग्रीन योजनेला प्रतिसाद दिला आहे. यातून १ कोटी ४८ लाख ७ हजार ५२० रुपयांची वार्षिक बचत होत आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.
गो-ग्रीन योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येते. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते गो-ग्रीनमधील ग्राहकांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाइनद्वारे लगेचच बिल भरणा करणे आणखी सोपे झाले आहे.
पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न
आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत गो-ग्रीन योजना पर्यावरण रक्षणासाठी देखील महत्वाची आहे. कागदी वीजबिलांचा वापर बंद केला तरी महावितरण मोबाईल ॲप व वेबसाइटवर ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल तसेच वीजबिल भरल्याचा पावत्या आदींची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे गो-ग्रीन योजनेत सर्व लघुदाब ग्राहकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.