पुणे – तंबाखू, सिंगारेट बनवणाऱ्या कंपन्याकडून होणाऱ्या आक्रमक जाहिरातीमुळे तरुण पिढी गुटखा आणि सिगारेट या व्यसनांकडे आकर्षित होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून तंबाखूच्या व्यसनाबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 31 मे हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. जगभरात 31 मे हा दिवस “तंबाखू विरोधी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ससून रुग्णालयात कार्यरत व्यसनमुक्ती सुविधा केंद्र यांच्यातर्फे मनोविकृतीशास्त्र विभागात “तंबाखू विरोधी दिन’ साजरा करण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रमात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, डॉ. विनायक काळे यांनी अध्यक्षपदी होते. कार्यक्रमाची सुरूवात डॉ. नितीन अभिवंत, विभाग प्रमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. डॉ. निशिकांत थोरात, नोडल अधिकारी, व्यसनमुक्ती सुविधा केंद्र, पुणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
मागील एक वर्षापासून ससून रुग्णालयात व्यसनमुक्ती सुविधा केंद्र कार्यरत असून दारू, गांजा, अफु, तंबाखू आणि इतर प्रकारच्या व्यसनांवर रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध देत आहे. मुंबई येथील मानसोपचारतज्ज्ञ आणि तंबाखू विरोधी चळवळीचे प्रणेते डॉ. धरवशाह यांनी उपस्थितांना तंबाखूमुळे होणाऱ्या विविध आजारांबद्दल आणि तंबाखूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी उपलब्ध विविध उपचार पद्धतींबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी तसेच “महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थे’च्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाटय सादर केले. तंबाखू विरोधी दिनानिमित्त आयोजित निबंध आणि पोस्टर्स स्पर्धेच्या विजेत्यांना उपस्थित मान्यवरांकडून बक्षिसांचे आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. डॉ. रश्मी सातपुते वैद्यकीय अधिकारी व्यसनमुक्ती सुविधा केंद्र यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले.
जगभरात दरवर्षी साधारणपणे ऐशी लाख मृत्यू तंबाखू सेवनामुळे होतात. तंबाखू सेवनामुळे मुखरोग, कर्करोग, हृदयविकार तसेच श्वसनाचे गंभीर आजार होतात तरुण वयामध्ये तंबाखूचे व्यसन वाढत आहे.