शिफारसपत्रांद्वारे इंग्रजी शाळांत बेकायदेशीर प्रवेश प्रकरण
तक्रारदाराने ऑडिओ क्लिपचा पेनड्राइव्ह सादर केल्याने खळबळ
पुणे – पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील काही बड्या अधिकाऱ्यांनी मोठे आर्थिक गैरव्यवहार करुन बेकायदेशीररित्या शिफारसपत्रे देवून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये काही ठराविक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिले आहेत. या प्रकरणी शिक्षण आयुक्तालयातील शिक्षण उपसंचालक व कृतीगटाचे प्रमुख हरुन अत्तार यांनी तब्बल दीड तास अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत जबाब नोंदवून सुनावणी घेतली. या सुनावणीचा सविस्तर अहवाल शिक्षण आयुक्तांकडे येत्या सोमवारी सादर करण्यात येणार आहे.
आर्थिक उलाढाली करून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी विद्यार्थी विकास मंचचे अध्यक्ष ऍड. सुरेश खुर्पे यांनी शिक्षण आयुक्त, पोलिस आयुक्त, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पुराव्यासह लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र, यावर ठोस कारवाई झाली नसल्याने खुर्पे यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून हल्लाबोल आंदोलन केले होते. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी याची गांभीर्याने दखल घेत सुनावणी घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना बजाविले होते. त्यानुसार शिक्षण आयुक्तालयातील शिक्षण उपसंचालक हरुन अत्तार यांनी गुरुवारी (दि.2) सुनावणी घेतली.
या सुनावणीस पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे, सहायक संचालक मीना शेंडकर, पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, तक्रारदार ऍड. सुरेश खुर्पे, वंचित आघाडीचे अतुल झोडगे आदी उपस्थित होते. अत्तार यांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकूण घेतले. त्यांचे जबाबही नोंदवून घेतले. यात तक्रारदाराने संबंधित अधिकारी व एजंट यांच्यातील संभाषणाच्या काही ऑडिओ क्लिपचा समावेश असलेला पेन ड्राइव्हही सादर केला. यामुळे अधिकाऱ्यांनाही घाम फुटला. सुनावणीचा इतिवृत्तांत व अहवाल तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, त्रिसदस्यीय चौकशी समितीने दोन महिने झाले तरी अहवाल सादर न केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यास चालढकल का करण्यात आली, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.
* वरिष्ठांना अंधारात ठेवून दिली शिफारसपत्रे
* एजंट व अधिकाऱ्यांचे संगनमत
* अधिकारी “गोत्यात’ सापडले
* प्रवेशात लाखो रुपयांची उलाढाल
* पेन ड्राइव्ह सील
* कारवाईतून पळवाट म्हणून बदलीसाठी प्रयत्न