पुणे – जिल्हा परिषद गण-गट रचनेचा प्रारुप आराखडा जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सोमवारी सादर केला. विभागीय आयुक्त गण-गट रचनेची तपासणी करून प्रारूप आराखड्यास दि.31 मे 2022 पर्यंत मान्यता देणार आहेत. तर प्रारूप रचना नागरिकांसाठी दि.2 जून रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, 2011 च्या जनगणेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 33 लाख 48 हजार 495 आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेसाठी 82 गट, तर पंचायत समित्यांसाठी 13 तालुके मिळून 164 गण असणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची मुदत मार्च 2022 मध्ये समाप्त झाली असून, सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केल्यानुसार जिल्हा प्रशासनाने प्रारुप आराखडा विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर केला आहे. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडेही गण-गट रचनेचा आराखडा तपासणीसाठी सादर केला होता. आयोगाच्या सूचनुनेसार गट आणि गणांची रचना करण्यासाठी 2011 जनगणना ग्राह्य धरण्यात आली आहे.
असा आहे कार्यक्रम
दि.2 जून 2022 रोजी गण-गट रचनेचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे. यावर नागरिकांना दि.2 ते दि.8 जूनपर्यंत हरकती-सूचना सादर करता येणार आहे. हरकतींवर सुनावणी घेऊन विभागीय आयुक्त दि.22 जून 2022 पर्यंत गण-गट रचना अंतिम करतील, तर अंतिम गण-गट रचना दि.27 जून रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.