पुणे –महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने प्रभागांसाठीच्या महिला आरक्षणांच्या सोडतीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पुण्यात 31 मे रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. आयोगाने पुण्यासह 13 महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला व नागपूर या महापालिकांचा
समावेश आहे.
तर मुंबई महापालिकेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. आयोगाने मागील आठवड्यातच आरक्षित प्रभाग जाहीर केले होते. त्यामुळे, आता केवळ कोणत्या प्रभागात आणि किती महिला उमेदवार असणार हे निश्चित होणार आहे. महापालिकेची निवडणुकीसाठी 58 प्रभाग निश्चित करण्यात आले असून 173 जागांसाठी ही निवडणूक त्यातील 57 प्रभागात प्रत्येकी 3 तर एका प्रभागात 2 उमेदवार असणार असणार आहेत. तर महिलांसाठी 87 जागा राखीव असणार असून पुरुषांसाठी 86 जागा असणार आहेत.
पुण्यात 28 प्रभागांत दोन महिला उमेदवार
महापालिका निवडणुकांसाठी 58 प्रभागांमध्ये 173 जागा असणार आहेत. त्यातील 87 जागा महिलांसाठी राखीव असणार असून या जागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहेत. महिलांसाठीच्या या 87 जागा पैकी अनुसूचित जातीच्या महिलांसाठी 12 जागा तर अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी 1 जागेचे आरक्षण काढले जाणार आहे. तर उर्वरीत 74 जागा खुल्या गटातून असणार आहेत. त्यामुळे, 58 प्रभागांत प्रत्येकी 1 महिला आरक्षण निघाल्यानंतर त्यानंतर उर्वरीत 28 महिला उमेदवारांसाठी पुन्हा 58 मधील 28 प्रभागांसाठी चिठ्ठी काढली जाईल. त्यामुळे 28 प्रभागांत दोन महिला उमेदवार असतील. मात्र, प्रभाग 13 मध्ये दोनच जागा असल्याने महिलांसाठीच्या जागांची सोडत उर्वरीत 57 प्रभागांमध्ये काढली जाणार आहे.
असा आहे आरक्षण कार्यक्रम
२७ मे अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यासाठी नोटीस जाहीर करणे
३१ मे अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढणे सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करणे
१ ते ६ जून आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त हरकती व सूचना दाखल करून घेणे
१३ जून हरकती सूचनांचा विचार करून अंतिम आरक्षण जाहीर करणे
दृष्टिक्षेपात आरक्षण (एकूण प्रभाग 58)
तीन सदस्यांचे 57 तर
2 सदस्यांचा एक प्रभाग
एकूण सदस्य 173
महिलांसाठी राखीव 87
(74 खुल्या गटातील महिलांसाठी राखीव)
अनुसूचित जाती जागा-23 (12 महिलांसाठी राखीव)
अनुसूचित जमाती जागा-2 (1 महिलांसाठी राखीव)