जेजुरी – “येळकोट येळकोट जय मल्हार’, “सदानंदाचा येळकोट’ असा गजर आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत दोन लाखांहून अधिक भाविकांनी जेजुरीच्या मल्हार गडावर देवदर्शन-कुलधर्म कुलाचार करीत कुलदैवत खंडेरायाचा सोमवती उत्सव साजरा केला. सुमारे सहा महिन्यांनंतर सोमवती उत्सव असल्याने त्यातच महाशिवरात्री यात्रा आल्याने दोन दिवसांपासून भाविकांनी जेजुरी शहरात मुक्काम ठोकला होता. शहरातील सर्व भक्तनिवास, लॉजिंग बोर्डिंग पुजारी वर्गाची निवासस्थाने फुल्ल झाली होती.
सोमवारी (दि.20) सकाळी 7 वाजता इनामदार पेशवे, माळवदकर पाटील, खोमणे पाटील यांनी आदेश करताच श्रींच्या उत्सवमूर्ती असलेल्या पालखी सोहळ्याने गडकोट आवारातून कऱ्हास्नानासाठी प्रस्थान ठेवले. यावेळी ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, सेवेकरी, पुजारी व राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची संख्या लक्षणीय होती.
अब्दागिरी, छत्रचामरे, घडशी समाजबांधवांचा सनई-चौघड्याचा मंगलमय सूर आणि पुढे मानाचा अश्व आणि भाविकांची भंडारा -खोबऱ्याची मुक्त उधळणीच्या साथीने पालखी सोहळा गडकोट मार्गावरून मल्हार गौतमेश्वर मंदिर येथे स्थिरावला. त्यानंतर जामा मशिदीपुढे पानसरे यांचा पानाचा विडा स्वीकारत ढालेवाडी रोड मार्गे कऱ्हा स्नानाला मार्गस्थ झाला.
दुपारी 12 वाजताचे दरम्यान कऱ्हा नदीतीरी रंभाई शिंपींन कट्ट्यावर (पापनाश तीर्थ) माध्यान्ह सूर्याच्या साक्षीने खंडोबा-म्हाळसा उत्सव मूर्तींना विधिवत दही दुधाचा अभिषेक करून कऱ्हास्नान घालण्यात आले आणि हजारो भाविकांनी स्नानाची पर्वणी लुटली. परतीच्या मार्गावर धालेवाडीकरांचा मान घेत फुलाईमाळीण कट्ट्याला भेट देत पालखी सोहळा जानाई मंदिर कट्ट्यावर स्थिरावला.
रात्री नगरप्रदक्षणा करीत 9 वाजता गडकोटात दाखल झाला. रोजमुरा (चिमूटभर धान्य) वाटप होऊन सोहळ्याची सांगता झाली. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर, उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवसंस्थानकडून कर्मचारी वर्गासह खासगी कमांडो तैनात केले होते.